मुंबई : आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे प्राणवायूसारखे आहेत. त्यामुळे भाजपाजवळ २४ X ७ ऑक्सिजन आहे. कोणी कितीही हायड्रोजन बॉम्ब आणले, तरीही विजय ऑक्सिजनचाच होतो.’, असे प्रतिपादन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) रोजी केले.
शुक्रवार (१४ नोव्हेंबर) रोजी बिहार विधानसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालात सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं दणदणीत यश मिळवलं. त्यानंतर भाजपाकडून मुंबईत विजयोत्सव साजरा करण्यात आला होता. यावेळी रविंद्र चव्हाण यांनी गमछा घालून भाजपप्रणित एनडीएचा विजय साजरा केला. तसेच कार्यकर्त्यांना संबोधित केले.
या वेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले. ते म्हणाले, ‘बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं काँग्रेस आणि मित्रपक्षांना त्यांची जागा दाखवून दिली. आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून त्यांना पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवून द्यायची आहे.’, असा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने १०१ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी तब्बल ८९ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाल्याने भाजपाच्या ९० टक्के स्ट्राईक रेटची राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. भारताच्या राजकीय पटलावरील एक महत्त्वाचे व मोठे राज्य म्हणजे बिहार. बिहारमधील राजकीय समीकरणांचा राष्ट्रीय राजकारणावर मोठा परिणाम पाहायला मिळतो. बिहारमधील एनडीएच्या विजयाने विरोधकांना बॅकफुटवर ढकलले आहे. त्यामुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकतर्फी अर्थात महायुतीच्या बाजुने होण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे.

0 Comments