Business

Header Ads

कोटक फ्लेक्सिकॅप फंडची दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या प्रवासाची १५ वर्षे पूर्ण

थोडक्यात पण महत्वाचे

स्थापने पासून सरासरी १६.५९ टक्के दराने वार्षिक चक्रवाढ परतावा प्रदान, शेअरबाजारातील विविध चढ-उतारांदरम्यान अतिशय मजबूत आणि सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२६ : कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड ("केएमएएमसी" / "कोटक म्युच्युअल फंड") च्या 'कोटक फ्लेक्सिकॅप फंड' योजनेने आपल्या वाटचालीच्या १५ वर्षांचा टप्पा अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या फंड योजनेने तिच्या शुभारंभापासून आतापर्यंत गुंतवणूकदारांना सरासरी १६.५९ टक्के दराने वार्षिक चक्रवाढ परतावा प्रदान केला आहे. बाजारातील विविध चढ-उतारांच्या काळातही या फंडाने या दीर्घकाळात अतिशय दमदार कामगिरीची नोंद केली आहे. 

कोटक महिंद्रा अॅ सेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह म्हणाले, “कोटक फ्लेक्सिकॅप फंडने १५ वर्षे पूर्ण करणे हा आमच्यासाठी त्याचबरोबर या फंडाशी एकनिष्ठ राहिलेल्या गुंतवणूकदारांसाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. फ्लेक्सिकॅप हा गुंतवणूक प्रकार अतिशय महत्त्वाचा ठरला आहे, कारण तो गुंतवणूकदारांना भारताच्या विविध क्षेत्रातील आर्थिक प्रगतीत सहभागी होण्यास संधी देतो. त्याचबरोबर विविध भांडवली मूल्याच्या कंपन्यांमध्ये किती पैसे गुंतवायचे, याचा निर्णय घेण्याची जबाबदारी एका अनुभवी गुंतवणूक टीमवर सोपवण्याची सुविधाही पदान करत."

३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, 'कोटक फ्लेक्सिकॅप फंडच्या ‘डायरेक्ट प्लॅन - ग्रोथ ऑप्शन’ ने गेल्या १० वर्षांत सरासरी १५.७० टक्के दराने वार्षिक चक्रवाढ आणि गेल्या ५ वर्षांत सरासरी १६.८७ टक्के दराने वार्षिक चक्रवाढ परतावा दिलेला आहे. या फंडाचे व्यवस्थापन कोटक महिंद्रा एएमसीच्या सीआयओ हर्षा उपाध्याय करत आहेत आणि त्यांची गुंतवणूकीची विचारसरणी कंपनीचे शाश्वत उत्पन्न, सक्षम प्रशासन आणि भांडवली कार्यक्षमता या तत्वांवर आधारलेली आहे. 

या फंडाच्या कामगिरीबद्दल बोलताना हर्षा उपाध्याय म्हणाल्या, “आम्ही सातत्याने शाश्वत कमाईची क्षमता आणि उत्कृष्ट भांडवल कार्यक्षमता असलेल्या कंपन्यांना प्राधान्य दिल्यामुळे कोटक फ्लेक्सिकॅप फंडाने गेल्या १५ वर्षांत शेअरबाजारातील विविध चढ-उतारांदरम्यान अतिशय यशस्वीरित्या मार्गक्रमण केले आहे. आमचा भर नेहमीच बाजारात अल्पकालीन कालावधीतील प्रवाहाच्या मागे न धावता, सखोल संशोधनावर आधारित समभागांच्या निवडीवर राहिलेला आहे. या दृष्टिकोनामुळे गुंतवणूकदारांना भारताच्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी होता आला आणि त्यांना दीर्घकाळात सातत्यपूर्ण परतावा देण्याचे आमचे उद्दिष्ट सफल झाले आहे.”

फ्लेक्सिकॅप फंड हा लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप अशा सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे बदलत्या बाजार परिस्थितीनुसार तो लवचिक राहू शकतो. डिसेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोटक फ्लेक्सिकॅप फंडाने सुमारे ७३ टक्के गुंतवणूक मोठ्या कंपन्यांमध्ये, १९ टक्के मध्यम कंपन्यांमध्ये आणि ५ टक्के लहान कंपन्यांमध्ये केली आहे. या फंडाचा पोर्टफोलिओ साकारताना 'टॉप-डाउन' पध्दतीने क्षेत्राचा अभ्यास आणि 'बॉटम-अप' पध्दतीने विशिष्ट समभागाची निवड अशा दोन्ही पद्धतींचा वापर केला जातो.

या फंडाची मुख्य गुंतवणूक वित्तीय सेवा, ऑटोमोबाईल आणि त्याचे सुटे भाग, कॅपिटल गुड्स, रसायने, बांधकाम साहित्य आणि ग्राहक सेवा या क्षेत्रांतील कंपन्यामध्ये आहे. जिथे समभागाची किंमत रास्त आहे आणि भविष्यातील नफ्याची स्पष्टता दिसत आहे, अशा दीर्घकालीन संधी शोधण्यासाठी संशोधनावर आधारलेला दृष्टिकोन या फंडाला गुंतवणूकीसाठी मदत करतो.

Post a Comment

0 Comments