Business

Header Ads

ॲडव्हान्टेज विदर्भ २०२६ मध्ये अदाणी समूहातील जित अदाणी यांचे मनोगत

०६ फेब्रुवारी २०२६, नागपूर, महाराष्ट्र

माननीय मंत्री महोदय, 
मान्यवर नेते, आदरणीय भागीदार आणि प्रिय मित्रांनो,

अॅडव्हान्टेज विदर्भ २०२६ मध्ये या मंचावर आपल्यासोबत उपस्थित राहणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. हा मंच केवळ विदर्भाचा किंवा महाराष्ट्राचा नव्हे, तर संपूर्ण भारताच्या भविष्याला दिशा देणाऱ्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींना एकत्र आणतो.

भविष्यासंदर्भात बोलण्यापूर्वी, विदर्भाने नेहमी कशाचे प्रतिनिधित्व केले आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. प्राचीन संस्कृतमध्ये रुजलेले 'विदर्भ' हे नावच पवित्रता, सुसंस्कृतपणा आणि पवित्र सामर्थ्याचे प्रतीक आहे. “वि” म्हणजे अद्वितीय किंवा वेगळेपण, आणि “दर्भ” म्हणजे पवित्र, टिकाऊ गवत. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये विदर्भ हा उत्कृष्ट कारागिरी, समृद्ध संस्कृती, ज्ञान आणि धैर्य यासाठी ओळखला जातो. ही रुक्मिणीची भूमी आहे, प्राचीन विदर्भ राजांचे राज्य आहे, आणि सभ्यता, ज्ञान व संस्कृती यांचा संगम म्हणून ओळखला जाणारा हा एक प्रदेश आहे.

तुकडोजी महाराजांच्या शिकवणुकींपासून ते आधुनिक महाराष्ट्र घडवणाऱ्या सुधारणा चळवळींपर्यंत, विदर्भाने भारताच्या नैतिक आणि बौद्धिक पायाभरणीला सतत बळ दिले आहे. प्रशासकीय दृष्ट्याही विदर्भाचे महत्त्व मोठे आहे. एकेकाळी मध्य प्रांत आणि बेरारची राजधानी असलेले आणि आज महाराष्ट्राची हिवाळी राजधानी असलेले नागपूर हे शहर ऐतिहासिक प्रशासकीय केंद्रातून उद्योग, नवकल्पना आणि कनेक्टिव्हिटीचे एक उदयोन्मुख केंद्र बनले आहे. भारताच्या भौगोलिक मध्यभागी असलेले, सुयोग्य शहरी नियोजन, शिक्षणसंस्था आणि वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी ओळखले जाणारे नागपूर आज लॉजिस्टिक्स, विमानवाहतूक आणि तंत्रज्ञानात आघाडीवर आहे. आधुनिकतेकडे वाटचाल करतानाही, या शहराने आपली ओळख कायम ठेवली आहे. 

माझा ठाम विश्वास आहे की विदर्भ ज्याच्या नावाचा अर्थ सामर्थ्य आणि वैशिष्ट्यांची भूमी असा आहे. आपल्या समृद्ध वारशाला नव्या आर्थिक आणि सांस्कृतिक शक्तीत रूपांतरित करण्यासाठी सज्ज आहे. योग्य पायाभूत सुविधा, सक्षम नेतृत्व आणि मजबूत भागीदारी मिळाल्यास हा प्रदेश पुन्हा एकदा शिक्षण, व्यापार आणि राष्ट्रीय विकासाचे केंद्र म्हणून पुन्हा उदयास येऊ शकतो.
आज आपण जे सकारात्मक वातावरण पाहतो आहोत, ते योगायोगाने निर्माण झालेले नाही. विदर्भाची क्षमता विकसित करण्यासाठी ज्या नेत्यांनी आपली राजकीय ताकद, प्रशासकीय दूरदृष्टी आणि वैयक्तिक विश्वास गुंतवला आहे, अशा नेतृत्वाच्या प्रयत्नांचा तो परिणाम आहे.

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक विकासावर भर देत, विदर्भासारख्या प्रतिभा आणि संसाधनांनी समृद्ध प्रदेशांना भारताच्या विकासकथेच्या अग्रभागी आणले आहे. पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि स्वच्छ ऊर्जेवर दिलेल्या त्यांच्या लक्षामुळे गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

विदर्भाचे अभिमानी सुपुत्र श्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण भारतातील कनेक्टिव्हिटीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा म्हणजे केवळ अभियांत्रिकी नव्हे, तर राष्ट्रनिर्मिती आहे. महामार्ग, द्रुतगती मार्ग आणि लॉजिस्टिक्स कॉरिडॉरच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या आर्थिक शक्तीला बळ दिले असून, तुकडोजी महाराजांनी अंगीकारलेल्या सेवा आणि उद्देशाच्या भावनेचेच हे प्रतिबिंब आहे.

श्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच संतुलित प्रादेशिक विकासासाठी ठाम भूमिका घेतली आहे. विदर्भाला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळेच आज आपण पाहत असलेली ही संधी निर्माण झाली आहे.या सर्व नेतृत्वाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आज विदर्भ फक्त “संभावना” म्हणून ओळखला जात नाही, तर “प्रगती” म्हणून ओळखला जात आहे.

विदर्भातील आमची उपस्थिती ही केवळ व्यवहारापुरती नाही; ती पिढ्यान्पिढ्यांपर्यंत टिकणारी आहे. आम्ही येथे ऊर्जासुरक्षा निर्माण करण्यासाठी, दर्जेदार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, समुदायांचे सशक्तीकरण करण्यासाठी आणि भारताचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी आलो आहोत. आमच्या येथील गुंतवणुका तीन राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत आहेत:

१) भारताच्या स्वच्छ आणि विश्वासार्ह ऊर्जा भविष्याला चालना देणे,
२) एकात्मिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स परिसंस्था विकसित करणे, आणि
३) समाज आणि युवकांसाठी समावेशक विकास घडवून आणणे.

हीच विकासाची संकल्पना माझ्या वडिलांनी मांडली होती, आणि ती जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे आणि अभिमानाने पुढे नेत आहोत.

आज विदर्भ भारताच्या ऊर्जा क्षेत्रात केंद्रस्थानी आहे. तिरोडा येथे आम्ही महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि प्रगत ३,३०० मेगावॅट क्षमतेचा सुपरक्रिटिकल वीजप्रकल्प चालवत आहोत, जो कार्यक्षमतेचे आणि पर्यावरणीय जबाबदारीचे जागतिक दर्जाचे निकष पूर्ण करतो. २०२५ मध्ये आम्ही ६०० मेगावॅटचा बुटीबोरी वीजप्रकल्प पुन्हा सुरू केला, ज्यातून अडचणीत आलेल्या प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करण्याची आणि भारताची ऊर्जा पायाभूत सुविधा मजबूत करण्याची आमची बांधिलकी दिसून येते. २५ वर्षांच्या वीजपुरवठा कराराद्वारे, खावडा येथील मोठ्या सौर ऊर्जेची क्षमता आणि मजबूत औष्णिक वीजपुरवठा यांचा संगम साधत, आम्ही आता महाराष्ट्राला ६,६०० मेगावॅट इतकी विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देत आहोत. हीच वीज महाराष्ट्राच्या उद्योगांना, शहरांना आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला आधार देणारी कणा आहे.

आमच्या सर्वात परिवर्तनकारी उपक्रमांपैकी एक म्हणजे कळमेश्वर येथील लिंगा येथे उभारण्यात येणारा ७०,००० कोटी रुपयांचा एकात्मिक कोळसा वायूकरण आणि डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह्ज प्रकल्प. या प्रकल्पामुळे ३०,००० प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, प्रगत रासायनिक उत्पादन क्षमतांचा विकास होईल, महत्त्वाच्या उद्योगांसाठी ऊर्जा स्वावलंबन वाढेल आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या जागतिक नकाशावर नागपूरचे स्थान ठामपणे अधोरेखित होईल. हा केवळ औद्योगिक प्रकल्प नाही, तर राष्ट्रीय आत्मनिर्भरतेसाठी एक नवीन व्यासपीठ आहे.

गोंडखैरी येथे आमची भूमिगत खाण जबाबदार खाणकामाचे उत्तम उदाहरण आहे. येथे जमिनीचा किमान वापर, कोणतेही विस्थापन नाही, स्फोटकाम नाही, पावसाचे पाणी साठवण, शून्य सांडपाणी उत्सर्जन आणि ५,००० झाडे लावण्याचा उपक्रम राबवला जात आहे. हे खाणकाम जबाबदारी, तंत्रज्ञान आणि समाजाला प्रथम प्राधान्य देण्याच्या विचारसरणीवर आधारित आहे.

बोरखेडी येथील ७५ एकरांच्या आयसीडी (इनलँड कंटेनर डेपो) प्रकल्पासह आणि संपूर्णमहाराष्ट्रातील २४ सीमावर्ती तपासणी नाक्यांच्या अधिग्रहणाद्वारे, आम्ही विदर्भाची लॉजिस्टिक्स गेटवे म्हणून भूमिका अधिक मजबूत करत आहोत. या सुविधांमुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होतो, निर्यात वाढते आणि हजारो व्यवसायांची जागतिक स्पर्धात्मकता सुधारते.

विमानवाहतूक आणि संरक्षण क्षेत्रात, इंडामर टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अधिग्रहणामुळे मिहानमधील आमचा ३० एकरांचा एमआरओ (मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल) संकुल अधिक विस्तारला आहे. १५ विमानांसाठी स्वतंत्र बे, एफएए आणि डीजीसीए प्रमाणपत्रे, तसेच एअर वर्क्सच्या जागतिक नेटवर्कशी एकात्मिक जोडणी यामुळे नागपूर विमान देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉलसाठी एक आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे.

पायाभूत सुविधा सोबतच, आम्ही समाजविकासासाठीही प्रामाणिकपणे कटिबद्ध आहोत. गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये अदाणी फाउंडेशन प्राथमिक आरोग्यसेवा, शिक्षण, ४३ बचत गटांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण, फॉर्च्यून सु-पोषण आहार कार्यक्रम तसेच सौर प्रकाश, स्वच्छ पाणी, खेळ, आणि शाळा विकास यांसारख्या उपक्रमांना पाठिंबा देत आहे. हा विकास सन्मान, सर्वसमावेशकता आणि सहानुभूतीवर आधारित आहे.

सस्टेनेबिलिटी म्हणजे टिकाऊपणा हे आमच्या कार्याचा मुख्य आधार आहे. तिरोडा प्रकल्प शून्य सांडपाणी उत्सर्जन पद्धती वापरतो; फ्लाय-अॅशचा पुनर्वापर सिमेंट, विटा आणि शेतीसाठी केला जातो; आणि आम्ही २०३० पर्यंत १० कोटी झाडे लावण्याच्या आमच्या संकल्पाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. अदाणी एनर्जी सॉल्यूशन्स २०२७ पर्यंत ६०% अक्षय ऊर्जेच्या स्रोतांकडे पोहोचण्याच्या मार्गावर आहे. विदर्भ आज हे दाखवून देत आहे की प्रगती आणि टिकाऊपणा कशा प्रकारे एकत्र येऊ शकतात.

भविष्याकडे पाहताना, मी विदर्भाला केवळ महाराष्ट्राचा एक भाग म्हणून पाहत नाही, तर असा प्रदेश म्हणून पाहतो जो पुढील अनेक दशकांमध्ये भारताच्या विकासाला आकार देईल. आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे - सशक्त, अद्वितीय आणि पवित्र - विदर्भ नेतृत्व करण्यास सज्ज आहे. देशाच्या नेतृत्वाने पाया तयार केला आहे, विदर्भातील लोक ऊर्जा, सर्जनशीलता आणि महत्त्वाकांक्षा घेऊन आले आहेत, आणि अदाणी समूह दीर्घकालीन भागीदार म्हणून तयार आहे.

एकत्र येऊन, आपण संधी, सहनशीलता आणि समृद्धी यांचे युग निर्माण करू. असे युग जे संपूर्ण देशाला प्रेरणा देईल. हे आमचे वचन आहे. हेच आमचे ध्येय आहे. आणि हाच तो विदर्भ आहे, जो आपण सर्व मिळून घडवू.

धन्यवाद. जय हिंद.

Post a Comment

0 Comments