Business

Header Ads

“आवाज महाराष्ट्राचा – नागपूरच्या परिवर्तनाचा” अभियानाची नागपुरातून घोषणा !

नागपुर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने आज नागपूर येथे “आवाज महाराष्ट्राचा – नागपूरच्या परिवर्तनाचा” या जनआंदोलनात्मक अभियानाची अधिकृत घोषणा करण्यात आली. शहरातील वाढत्या नागरी समस्या, बेरोजगारी, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, महागाई, प्रदूषण आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले की, नागपूर हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे शहर असूनही आज नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्व असलेल्या या शहरात मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली.

या अभियानांतर्गत खालील प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे:

🔷 स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा
🔷 खड्डेमुक्त रस्ते आणि प्रभावी वाहतूक व्यवस्थापन
🔷 बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी
🔷 महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना
🔷 स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन सुधारणा
🔷 महानगरपालिका रुग्णालये व आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणे
🔷 पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण

झोपडपट्टी तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रभावी उपाय
अभियानाच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे पदाधिकारी शहरभर नागरिक संवाद, जनआंदोलन, निवेदन मोहीम, विभागनिहाय बैठका आणि जनजागृती कार्यक्रम राबविणार आहेत.

शिवराज मोरे यांनी स्पष्ट केले की, हे अभियान केवळ टीकेपुरते मर्यादित नसून “संवाद • संघर्ष • समाधान” या भूमिकेतून नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी लढा उभारला जाणार आहे.

या वेळी युवक काँग्रेस चे प्रदेश प्रभारी अजय चिकारा यांनी केंद्र सरकारच्या निष्क्रिय धोरणांवर टीका करताना वाढती महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदेला युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी नवज्योत सिंग संधू, नागपूर झोन इन्चार्ज व उपाध्यक्ष कपिल ढोके, उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, अनुराग भोयर, महासचिव अभिषेक धवड, रितेश पांडव, रौनक चौधरी,अक्षय हेटे, सुशांत लोखंडे,सागर चव्हाण, अनुष्का वानखेडे, प्रदेश सचिव निखिल वानखेडे,श्रीकांत ढोणे, राधिका देशमुख,रोमा चौधरी,मेहुल आडवाणी, हेमंत कातुरे, धीरज धकाते,सोबत अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments