2 जून 2026 : इंडियनऑइल सध्याच्या इंधन पुरवठा परिस्थितीबाबत दररोज अद्ययावत माहिती देत आहे आणि विकसित होत असलेल्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देत आहे.
सध्याच्या भू-राजकीय परिस्थिती असूनही, इंडियनऑइलने घरगुती एलपीजी ग्राहकांना 100 टक्के पुरवठा सुनिश्चित केला आहे. घरगुती वापरासाठीच्या एलपीजी पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
व्यावसायिक एलपीजीसाठी रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना प्राधान्य देण्यात येत असून, औषधनिर्मिती, पोलाद, वाहन, बियाणे आणि कृषी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांनाही अखंड कार्यसंचालनासाठी प्राधान्याने पुरवठा केला जात आहे. याशिवाय, स्थलांतरित कामगारांची वाढती मागणी लक्षात घेऊन 5 किलो फ्री ट्रेड एलपीजी (एफटीएल) सिलिंडर्सचा पुरवठा वाढविण्यात आला आहे.
पुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी, इंडियनऑइलने पुरवठा आणि मागणी या दोन्ही स्तरांवर विविध नियंत्रणात्मक उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. यामध्ये रिफायनरी उत्पादन वाढविणे, शहरी भागात एलपीजी रिफिल बुकिंगमधील अंतर 21 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत वाढविणे, ग्रामीण भागात ते 45 दिवसांपर्यंत वाढविणे तसेच अत्यावश्यक क्षेत्रांना प्राधान्याने पुरवठा करणे यांचा समावेश आहे.या उपाययोजनांमुळे देशभरातील एलपीजी वितरकांकडे कोणत्याही प्रकारच्या तुटवड्याची नोंद झालेली नाही.
इंडियनऑइलने नागरिकांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची घाबरून खरेदी करू नये,असे आवाहन करणारा सार्वजनिक सल्लाही जारी केला आहे.ग्राहकांना इंधन उत्पादनांची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची हमी देण्यात आली आहे. इंधन उपलब्धतेसंदर्भातील अचूक माहितीसाठी ग्राहकांनी केवळ अधिकृत यंत्रणा आणि इंडियनऑइलकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एलपीजी ग्राहकांना डिजिटल बुकिंग प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास आणि अनावश्यकपणे वितरकांकडे भेट देणे टाळण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे.
तसेच, मोठ्या प्रमाणात आणि औद्योगिक ग्राहकांना डिझेलची खरेदी केवळ अधिकृत खरेदी मार्गांद्वारे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून इंधन वितरण सुरळीत आणि कार्यक्षम राहील.

0 Comments