देशभरातील तरुण प्रतिभावंतांना एकत्र आणणारा टीसीएसचा आघाडीचा क्विझ उपक्रम बुद्धिमत्ता, कल्पकता आणि ज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देतो
नागपूर, 20 ऑगस्ट 2026 : माहिती तंत्रज्ञान सेवा, कन्सल्टिंग आणि व्यवसायांसाठी उपाययोजना देणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) (BSE: 532540, NSE: TCS) आयोजित केलेल्या, टीसीएस इनक्विझिटिव्ह २०२६ ची नागपूर फेरी अतिशय उत्साहात पार पडली. या चुरशीच्या स्पर्धेमध्ये जलद उत्तरे देण्याच्या क्षमता आणि प्रभावी ज्ञानाचे प्रदर्शन करत भवन्स बीपी विद्या मंदिर, चिंचभुवन या शाळेचे आयरिन जॉर्ज आणि शौर्य बेले यांनी नागपूर फेरीचे विजेतेपद पटकावले. भारताच्या 'टायगर कॅपिटल'मधील शिक्षणाप्रतीच्या ओढीचे दर्शन घडवत, या विद्यार्थ्यांनी सेमीफायनलमध्ये स्थान मिळवत, उत्तम ताळमेळ आणि समस्या निवारणाच्या क्षमतांचे प्रदर्शन केले.
यंदाच्या नागपूर फेरीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील ५३ शाळांमधील तब्बल ३७० संघांनी यात भाग घेतला होता. यावेळी प्रो. (डॉ.) प्रेम लाल पटेल (अध्यक्ष आयएसएच आणि संचालक व्हीएनआयटी नागपूर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या वतीने टीसीएस नागपूरचे डिलिव्हरी सेंटर हेड श्री अरविंद कुमार यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
एआयची ताकद दर्शवत, यंदाच्या वर्षी टीसीएस इन्क्विझिटिव्हमध्ये रियल-टाईम एआयवर चालणाऱ्या ऍनालिटिक्सची सुरुवात केली गेली. त्यामुळे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीनंतर आपल्या कामगिरीची तपशीलवार माहिती पाहून, त्यामध्ये सुधारणा करण्याच्या शक्यता ओळखण्यात मदत झाली.
टीसीएस नागपूरचे डिलिव्हरी सेंटर हेड, अरविंद कुमार म्हणाले, “नागपूर आपल्या मजबूत शैक्षणिक पायासाठी आणि उदयास येणाऱ्या इनोव्हेशन इकोसिस्टमसाठी ओळखले जाते. जिज्ञासा आणि ज्ञानाचा उत्सव साजरा करणाऱ्या या स्पर्धेसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. या वर्षीच्या स्पर्धकांनी दाखवलेला उत्साह, आत्मविश्वास आणि विश्लेषणात्मक विचार खरोखरच कौतुकास्पद होता. तरुण मनांमध्ये शिकण्याप्रती अशी आवड आणि अटूट जिद्द पाहणे अत्यंत उत्साहवर्धक आहे. आम्ही सर्व संघांचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करतो आणि विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, कारण ते पुढे जाऊन राष्ट्रीय उपांत्य फेरीत आपल्या शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत.”
इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असलेली ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा संगम ठरली. या स्पर्धेत शिक्षण, मनोरंजन, क्रीडा जगतासह बिझनेस ट्रेंड्स, जाहिरात क्षेत्र आणि सोशल मीडिया अशा वैविध्यपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला होता. यंदाच्या क्विझमध्ये 'स्टेम' (STEM) म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला होता, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, ऑटोमेशन, बायोमेट्रिक्स आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला.
'टीसीएस इनक्विझिटिव्ह'चे हे २८ वे वर्ष आहे. आता हा भारतातील एक प्रतिष्ठित आंतर-शालेय क्विझ प्लॅटफॉर्म मानला जाऊ लागला आहे. असा प्लॅटफॉर्म जो विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांना नवीन कल्पना शोधण्यासाठी, त्यांचे दृष्टिकोन रुंदावण्यासाठी आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाविषयी सखोल समज विकसित करण्यासाठी प्रेरित करत आहे.
२०२६ ची ही आवृत्ती पुणे, इंदूर, बेंगळुरू, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, भुवनेश्वर, कोची, कोलकाता आणि मुंबई येथे आयोजित केली जात आहे, ज्याची सांगता राष्ट्रीय अंतिम फेरीने होईल; जिथे देशातील सर्वात हुशार तरुण क्विझर्स 'टीसीएस इनक्विझिटिव्ह नॅशनल चॅम्पियन २०२६' या बहुमानित विजेतेपदासाठी स्पर्धा करतील.

0 Comments