थोडक्यात पण महत्त्वाचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती
नागपुर : प्रदीर्घ सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक कार्यातून समाजजीवनात आपला ठसा उमटविणारे प्रा. अनिल सोले यांच्या ६७व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. अनिलजी सोले मित्र परिवाराच्या वतीने रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता अँड बँक्वेट हॉल, दक्षिण एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळ, वर्धा रोड, नागपूर येथे हा सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्रा. अनिल सोले यांच्या बहुआयामी कार्यावर आधारित 'अविरत कार्यरत प्रा. अनिल सोले' या गौरवग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास सर्व आमदार, भाजपाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, साहित्यिक, कलाकार, युवक तसेच प्रा. सोले यांचे सहकारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
प्रा. अनिल सोले यांनी विद्यार्थी चळवळीपासून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात करत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. शिक्षक, लोकप्रतिनिधी, महापौर, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. नागपूरच्या विकासासोबतच पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, वृक्षारोपण, शिक्षण, युवक सक्षमीकरण आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी विविध उपक्रम राबविले.
नागपूरचे महापौर म्हणून त्यांच्या कार्यकाळात लोकसहभागातून विकासाला चालना देण्यासोबतच 'हरित नागपूर', स्वच्छता, आरोग्य आणि नाग नदीच्या पुनरुज्जीवनासारख्या विषयांना त्यांनी प्राधान्य दिले. ग्रामीण भागात जलसंवर्धन व जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याच्या प्रश्नावर काम करण्यासोबतच वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांनाही त्यांनी चालना दिली.
युवकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने 'यूथ एम्पॉवरमेंट समिट'सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना विचार, कौशल्य आणि नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कामही त्यांनी केले. राजकारणात सक्रिय असतानाही साहित्य आणि कवितेशी असलेले नाते जपत त्यांनी आपले कवीमन आणि सांस्कृतिक संवेदनशीलता कायम ठेवली आहे.
प्रा. सोले यांच्या या बहुआयामी कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. अनिलजी सोले मित्र परिवाराचे संयोजक गिरीश व्यास यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला आमदार संजय भेंडे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णाजी खोपडे, ज्येष्ठ नेते गिरीश व्यास, जयप्रकाश गुप्ता आणि डॉ. गौरीशंकर पाराशर यांची उपस्थिती होती.

0 Comments