Business

Header Ads

जागतिक मधुमेह दिन 2025 ; या हिवाळ्यात वाढत्या मधुमेहाचे धोके समजून घेऊया !

नागपूर, 12 नोव्हेंबर 2025 - हिवाळा सुरु होताच विदर्भ आणि नागपूर परिसरात मधुमेह नियंत्रणाकडे अधिक जागरूकतेची गरज भासते. हिवाळ्यात थंड हवामानामुळे दैनंदिन जीवनशैलीत अनेक बदल दिसून येतात. शारीरिक हालचाल कमी होते, जड अन्न खाल्ले जाते आणि झोपेचा क्रम बिघडतो. ज्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण अधिक कठीण होते. अनेक लोकांमध्ये मधुमेह हा नेहमीप्रमाणे लठ्ठपणा किंवा हालचालीच्या अभावामुळेच होत नाही.

डॉ. स्वरूप वर्मा, इंटरनल मेडिसिन आणि जनरल फिजिशियन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांनी सांगितले कि, अलीकडच्या स्थानिक निष्कर्षांनुसार एक चिंताजनक गोष्ट समोर आली आहे. विदर्भात अधिकाधिक लोकांना कमी वयातच टाइप 2 मधुमेह होत आहे, आणि त्यापैकी बरेच जण दिसायला सडपातळ, बारीक आणि पूर्णपणे निरोगी आहेत. मधुमेहाचा हा “अपारंपरिक” प्रकार दाखवतो की फक्त लठ्ठपणा किंवा निष्क्रिय जीवनशैलीमुळेच मधुमेह होतो, असे नाही.

ग्रामीण भारतातील जवळपास 45 टक्के लोक आता मधुमेहाने प्रभावित असल्याचा अंदाज वर्तविला जातो, म्हणजे हा आजार शहरांच्या पलीकडे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पसरला आहे. फक्त नागपूरमध्येच सुमारे 30,000 लोकांना मधुमेह असल्याची शक्यता आहे, पण त्यांना याची कल्पनाच नाही असे मी निरीक्षण केले आहे. विशेषतः अर्ध-शहरी (उपनगर) आणि ग्रामीण भागांमध्ये, जिथे जनजागृती आणि तपासणीची सुविधा अजूनही मर्यादित आहे.

डॉ. स्वरूप वर्मा, पुढे म्हणाले, जास्त ताण, कुटुंबातील मधुमेहाचा इतिहास, उच्च रक्तदाब आणि दीर्घकाळ बसून राहण्याची सवय यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित सवयींमुळे मधुमेहाचा धोका आणखी वाढतो. हिवाळ्यात ही जोखीम अधिक वाढते. थंडीत बाहेरची हालचाल कमी होते, पचायला जड अन्न खाल्ले जाते आणि सणासुदीच्या काळातील खाणेपिणे वाढते, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे अधिक कठीण होते.

म्हणूनच स्थानिक आरोग्य तज्ञ हिवाळ्यात विशेष तपासणी आणि लवकर निदान मोहिम राबवण्याचे आवाहन करत आहेत. या मोहिमा फक्त लठ्ठ किंवा वृद्ध लोकांपुरते मर्यादित नसून तरुण आणि सडपातळ बारीक दिसणाऱ्या व्यक्तींनाही लक्षात घेऊन राबवले जात आहेत, कारण त्यांनाही मधुमेहाचा धोका असू शकतो.    

या जागतिक मधुमेह दिनानिमित्त, विदर्भासाठीचा संदेश तातडीचा पण आशादायक आहे. हिवाळ्यात जीवनशैलीत बदल होत असल्यामुळे साखरेचे प्रमाण वाढल्याची लक्षणे ओळखणे कठीण होते, त्यामुळे वेळेवर तपासणी आणि लवकर निदान करणे खूप महत्त्वाचे आहे.

लक्ष देण्यासारखी सुरुवातीची लक्षणे :

मधुमेहाची काही सुरुवातीची लक्षणे म्हणजे — खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे, कारण नसताना थकवा जाणवणे, वजनात अचानक बदल होणे, दृष्टी धूसर होणे, जखमा हळू हळू भरून येणे आणि वारंवार संसर्ग होणे. जवळपास 60% लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे सर्वांनी या हिवाळ्यात आरोग्य तपासणी करून घ्यावी, नियमित व्यायाम करावा, सक्रिय राहावे, आहारावर नियंत्रण ठेवावे आणि आपले आरोग्य स्वतः सांभाळावे. कारण मधुमेहाचे बदलते स्वरूप समजून घेणे हे त्यावर नियंत्रण मिळवण्याचे पहिले पाऊल आहे.

Post a Comment

0 Comments