थोडक्यात पण महत्त्वाचे
हिवाळ्यातील ताठरपणापासून रोबोटिक शस्त्रक्रियेपर्यंत विदर्भातील कुटुंबे गुडघेदुखीसाठी अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी उपचार शोधत आहेत.
नागपुर : दरवर्षी नागपूर आणि विदर्भात हिवाळा आला की गुडघे आणि कंबरदुखीच्या तक्रारीं घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या हळूहळू का होईना पण नक्कीच वाढताना दिसते. हे बहुतेक वेळा एकसारखेच असते. संकोचलेले स्मित हास्य, चालण्यातली मंद गती आणि जवळपास रोजच ऐकू येणारी ती परिचित ओळ: “डॉक्टर, थंडी पडली की गुडघे चालतच नाहीत. मी पुन्हा पूर्वीसारखा होऊ शकेन का?”
ही केवळ नियमित साधी तपासणी नसते. प्रत्येक रुग्णाबरोबर त्याची एक कथा, एक चिंता आणि मनात दडलेली भीती असते, की कदाचित त्यांची चालण्याची क्षमता पुन्हा पूर्वीसारखी होणार नाही. काटोल येथील अशाच एका 72 वर्षांच्या महिलेने सांगितले की हिवाळा सुरू होताच तिचे गुडघे “जाम” होतात आणि त्यामुळे तिने सकाळी मंदिर जाणेही बंद केले होते. त्यांच्या या शब्दांनी मला विचारात पाडले, कारण हिवाळा फक्त सांध्यांवर परिणाम करत नाही. तो आत्मविश्वास, स्वातंत्र्य आणि दैनंदिन जीवनावरही परिणाम करतो.
हिवाळ्यात थंड हवेमुळे सांध्यांभोवतीचे ऊतक नैसर्गिकरित्या कडक होतात, सांध्यातील ल्युब्रिकेशन कमी होते आणि वेदना वाढतात. विशेषतः ज्यांना आधीच संधिवात आहे किंवा वयानुसार सांध्यांची झिज झाली आहे, त्यांना याचा अधिक त्रास होतो. ठंडी थोड़ी जारी वाढली तरी तरी बिछान्यातून उठणे, पायऱ्या चढणे किंवा बाजारात जाणे यांसारखी साधी कामेसुद्धा अवघड वाटू लागतात. विदर्भातील अनेक जेष्ठ नागरिक हिवाळ्यात हालचाल कमी करतात, विश्रांती घेतल्याने आराम मिळेल असे त्यांना वाटते. परंतु प्रत्यक्षात उलटेच होते. कमी हालचालीमुळे कडकपणा वाढतो, स्नायू कमजोर होतात आणि पडण्याची भीती अधिक वाढते.
कुटुंबांना सगळ्यात जास्त चिंता वाटते ती या वेदनेमुळे जेष्ठ व्यक्तींच्या मनावर होणाऱ्या परिणामांची. जे ज्येष्ठ आधी स्वावलंबी होते, ते आता छोट्या-छोट्या कामांसाठीही आपल्या कुटुंबियांवर अवलंबून राहू लागतात. ते सामाजिक कार्यक्रमांना जाणे टाळतात, संध्याकाळी फिरायला जाणे बंद करतात किंवा त्यांचे आवडते छंदही सोडून देतात. मी नेहमी सांगतो गुडघेदुखी फक्त सांध्यांना नाही, तर मनालाही दुखावते.
नागपूरमध्ये आज दिसणारा सकारात्मक बदल म्हणजे आधुनिक उपचारांविषयी वाढती जागरूकता आणि लोकांचा वाढता स्वीकार. जे लोक आधी जॉइंट रिप्लेसमेंटबद्दल बोलायलाही घाबरत होते, ते आता स्वतःहून प्रश्न विचारतात, आधुनिक उपचारांची माहिती घेतात आणि दीर्घकाळ वेदना सहन करण्यापेक्षा चालणे-फिरणे सुधारण्याला जास्त महत्त्व देतात. या बदलामध्ये रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंटची मोठी भूमिका आहे. “रोबोटिक” हा शब्द ऐकला की अनेकांना ते अवघड किंवा धोकादायक वाटते, पण प्रत्यक्षात ही तंत्रज्ञान पद्धत फक्त शस्त्रक्रिया अधिक अचूक आणि सुरक्षित करण्यासाठी मदत करते. शस्त्रक्रियेदरम्यान पूर्ण नियंत्रण डॉक्टरांकडेच असते, आणि रोबोटिक सिस्टम हे सुनिश्चित करते की जॉईंट पूर्णपणे योग्य स्थितीत आणि रुग्णाच्या शरीरानुसार बसवले जावे. यामुळे बरे होण्याची प्रक्रिया लवकर होते आणि वेदना ही कमी होतात.
"ज्येष्ठ नागरिकांसाठी याचा अर्थ असा की शस्त्रक्रियेनंतर ते काही तासांत चालू शकतात, वेदना कमी होतात आणि लवकर आत्मविश्वास परत मिळवतात. रुग्ण फॉलो-अपसाठी येताना त्यांच्या चेहऱ्यावरचे परत आलेले स्मित हास्य पाहणे खूप समाधान देणारे असते. अनेक रुग्ण म्हणतात, “डॉक्टर, या वर्षीच्या हिवाळ्यात मी आधीपेक्षा चांगलं चालतोय.” काटोल येथील 72 वर्षीय आजी इतरांना अभिमानाने सांगतात की वयामुळे कोणीही उपचार घेणे टाळू नये, आणि त्यांनी पुन्हा भीतीशिवाय मंदिरात जाण्यास सुरुवात केली आहे."
या हिवाळ्यात विदर्भातील सर्व कुटुंबांना माझा साधा संदेश आहे कि गुडघेदुखीचा त्रास, विशेषतः ज्येष्ठ लोकांमध्ये, दुर्लक्षित करू नका. वेळेवर तपासणी, योग्य वेळी उपचार आणि योग्य पद्धतीने केलेली काळजी यामुळे त्यांना भीती आणि वेदनामुक्त आयुष्य मिळू शकते. चालणे म्हणजे फक्त हालचाल नाही, ते म्हणजे सन्मानाने, आत्मविश्वासाने आणि आनंदाने पूर्ण आयुष्य जगणे.

0 Comments