थोडक्यात पण महत्त्वाचे
शालिनिताई मेघे हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन यांनी दुर्लभ क्रॅनिओव्हर्टिब्रल जंक्शन (सीव्हीजे) विकार असलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली
नागपुर : 28 वर्षीय पुरूष रुग्ण गेल्या 2–3 वर्षांपासून मानदुखीने त्रस्त होता, त्याला चालण्यास त्रास होत होता आणि हातांचा वापर करण्यासही त्रास होत होता, ज्यामुळे दैनंदिन कामे करणे कठीण होत होते. यासाठी त्याने शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले, पण सुधारणा झाली नाही. शेवटी तो नागपूरच्या वानडोंगरी येथील 1020 बेड्सच्या शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये दाखल झाला. कालांतराने त्याची तब्येत आणखी बिघडली; ज्यामुळे हालचाली मंदावल्या, सतत वेदना होऊ लागल्या आणि हात-पाय सुन्न होऊन दोन्ही बाजू कडक झाल्या होत्या.
सविस्तर वैद्यकीय आणि रेडियोलॉजिकल तपासणीनंतर, सीनियर न्युरोसर्जन आणि असोसिएट प्रोफेसर डॉ. परेश कोरडे यांनी रुग्णाला दुर्मिळ जन्मजात क्रॅनिओव्हर्टिब्रल जंक्शन (सीव्हीजे) विकारासह C2–C3 हाडांची सरकणारी समस्या (लिस्थेसिस) असल्याचे निदान केले, ज्यामुळे त्याला मणक्याच्या मज्जातंतूमध्ये त्रास होत होता. डॉ. कोरडे यांनी सांगितले की ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे, ज्यामध्ये जन्मजात सीव्हीजे विकृतीमुळे मानेच्या खालील हाडे हळूहळू सरकली आणि त्यामुळे मणक्याच्या नसांवर सतत दबाव पडत होता.
रुग्णाची गंभीर न्यूरोलॉजिकल स्थिती आणि प्रकृती अधिक बिघडण्याची शक्यता असल्याने शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांना या जटिल शस्त्रक्रियेबद्दल आणि त्यासंबंधित संभाव्य धोके समजावून सांगितले गेले, ज्यात चारही हात-पाय कमकुवत होणे (क्वाड्रीपेरेसिस) आणि शस्त्रक्रियेनंतर वेंटिलेटरची गरज पडण्याची शक्यता होती. संमती मिळाल्यानंतर, एक अत्यंत गुंतागुंतीची आणि उच्च जोखमीची न्युरोसर्जिकल शस्त्रक्रिया नियोजित करण्यात आली.
एसएमएचआरसीचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत गावंडे यांनी सांगितले की डॉ. परेश कोरडे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आणि त्यांना डॉ. प्रिन्स वर्मा यांनी मदत केली. न्युरोअनॅस्थेसिया टीमचे नेतृत्व डॉ. प्राची कोरडे (सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ न्युरो-अॅनेस्थेसियोलॉजिस्ट) यांनी केले आणि त्यांना डॉ. शिवानी वारगंटीवार(सहाय्यक प्राध्यापक) यांनी मदत केली. सिस्टर वैशाली काळमेघ (ओटी इंचार्ज), सिस्टर नंदिनी पोर्टे (वॉर्ड इंचार्ज), सिस्टरसोनिया डोंगरे, सिस्टर मनीषा पिने आणि ब्रदर प्रशांत गोसावी यांनी शस्त्रक्रियेदरम्यान आणि नंतर रुग्णांची काळजी घेतली. सुश्री. दिव्या सेजुळे (ओटी मॅनेजर), श्री अहमिंद्र जैन (कॅशलेस सेल इंचार्ज) आणि श्री आशीष दारने (फ्लोर मॅनेजर) यांनी प्रशासकीय सहकार्य केले.
शस्त्रक्रियेतील आव्हानांबाबत अधिक माहिती देताना डॉ. कोरडे यांनी सांगितले की, मानेच्या मणक्यांची रचना बिघडलेली आणि हाडे ठिसूळ असल्यामुळे ही शस्त्रक्रिया खूपच कठीण होती. तसेच मणक्यांजवळून जाणाऱ्या रक्तवाहिन्या वरच्या बाजूला असामान्य स्थितीत असल्याने शस्त्रक्रियेचा धोका अधिक वाढला होता. या सर्व अडचणी असूनही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. आधुनिक सुविधांनी सज्ज ऑपरेशन थिएटर, प्रशिक्षित ओटी कर्मचारी, काळजीपूर्वक केलेले न्यूरो-अॅनेस्थेशियाचे व्यवस्थापन आणि डॉ. कोरडे यांच्या म्हणण्यानुसार “देवाची कृपा आणि रुग्णाचा विश्वास” यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आली नाही.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या न्यूरोलॉजिकल स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून आली आणि तो पुन्हा चालू लागला. त्याची बहुतांश लक्षणे मोठ्या प्रमाणात कमी झाली. डॉ. कोरडे यांनी सांगितले की अशा प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेचा धोका जास्त असतो, पण अनुभवी डॉक्टरांकडून योग्य वेळी उपचार झाले तर आजार वाढण्यापासून रोखता येतो आणि अपंगत्वही कमी किंवा पूर्णपणे टाळता येते. त्यामुळे तरुण रुग्ण अंथरुणाला खिळून राहण्यापासून आणि इतरांवर अवलंबून राहण्यापासून वाचला. या यशस्वी उपचारामुळे रुग्णाच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली असून तो आता स्वाभिमानाने आणि स्वावलंबीपणे जीवन जगू शकतो.
या यशाबद्दल अभिमान व्यक्त करताना, डीएमआयएचईआर (डीयू) ऑफ-कॅम्पस, नागपूरचे डायरेक्टर डॉ. अनुप मरार म्हणाले, “ही दुर्मीळ आणि उच्च जोखमीची शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या न्यूरोलॉजिकल आजारांवर उपचार करण्याची शलिनीताई मेघे हॉस्पिटलची वाढती क्षमता दाखवते. आमचे शल्यचिकित्सक, अॅनेस्थेसियोलॉजिस्ट, नर्सिंग आणि सहाय्यक कर्मचारी यांच्या कौशल्य, टीमवर्क आणि समर्पणामुळे हळूहळू अपंग होत चाललेल्या एका तरुण रुग्णाचे आयुष्य बदलले. अशा यशस्वी उपचारांमुळे रुग्णाला केंद्रस्थानी ठेवून प्रगत उपचार देण्याची आमची बांधिलकी अधिक मजबूत होते.”
विशेष म्हणजे, ही प्रगत आणि उच्च जोखमीची मेंदूची शस्त्रक्रिया भारत सरकारच्या ईएसआयसी (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) योजनेअंतर्गत कॅशलेस पद्धतीने करण्यात आली. या योजनेद्वारे विमाधारक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपूर्णआरोग्यसेवा सुविधा दिल्या जातात.
न्युरोसर्जरी विभागाने डीएमआयएचईआर (डीयू) व्यवस्थापनाच्या निष्ठावान सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले, ज्यात डॉ. राजीव सोनरकर (एचओडी, शस्त्रक्रिया), डॉ. अंजली मोडक (एचओडी, अॅनेस्थेशिया), डॉ. प्रतिभा देशमुख (डायरेक्टर, अॅनेस्थेशिया) आणि निवासी डॉक्टर डॉ. युवराज आणि डॉ. शुभम यांचा समावेश आहे.

0 Comments