Business

Header Ads

नागपूरमध्ये आपला सर्वात मोठा उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी, पहिल्या टप्प्यातील 800 एकर जमिनीचा ताबा मिळवण्याच्या दिशेने महिंद्राची वाटचाल

मुंबई, 1 सप्टेंबर 2026 : महाराष्ट्रातील नागपूर येथील अॅडिशनल बुटीबोरी येथे आपल्या सर्वात मोठ्या सर्वसमावेशक ऑटोमोबाईल आणि ट्रॅक्टर निर्मिती प्रकल्पासाठी, सुमारे 800 एकर जमिनीचा पहिला टप्पा ताब्यात घेण्याच्या दिशेने महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड वाटचाल करते आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेला हा ग्रीनफील्ड प्रकल्प विदर्भातील 1,500 एकर जागेवर विकसित केला जाणार असून, त्याला पूरक म्हणून संभाजीनगर येथे 150 एकरचा सप्लायर पार्क उभारले जाणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर, त्याची वार्षिक उत्पादन क्षमता 5 लाख वाहने आणि 1 लाख ट्रॅक्टर्स इतकी असेल; ज्यामुळे हा प्रकल्प महिंद्राचा देशातील सर्वात मोठा सर्वसमावेशक निर्मिती प्रकल्प ठरेल. संभाजीनगर येथील सप्लायर पार्क नागपूरमधील या नवीन प्रकल्पाला, तसेच चाकण आणि नाशिक येथील महिंद्राच्या विद्यमान प्रकल्पांनाही विविध सुटे भाग पुरवणार आहे.

या सुविधेच्या उभारणीसोबतच, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ आणि कौशल्ये महिंद्रा विकसित करत आहे. यामध्ये विविध पॉवरट्रेन्स आणि भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित वाहने तसेच ट्रॅक्टर्सच्या निर्मितीसाठी आवश्यक कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांची ओळख पटवणे, त्यांचा विकास करणे आणि त्यांना कौशल्य-प्रशिक्षण देणे अशा गोष्टींचा समावेश असेल.

आपल्या विद्यमान उत्पादन प्रकल्पांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा अनुभव आणि कौशल्य यांचा लाभघेण्यावर महिंद्राचा भर असेल. पुढील दोन ते तीन वर्षात, या कुशल आणि अनुभवी कर्मचाऱ्यांना नवीन सुविधेतील विविध पदांसाठीच्या सविस्तर निवड प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल.

तांत्रिक क्षमता, प्रत्यक्ष वर्तणूक, महिंद्राच्या मूल्यांशी सुसंगतता आणि प्रभावीपणे सहकार्य करण्याची क्षमता यांचा या निवड प्रक्रियेमध्ये विचार केला जाईल. तसेच, मेकॅनिकल ऑपरेशन्स, वेल्डिंग आणि पेंटिंग यांसारख्या क्षेत्रात कौशल्ये विकसित करण्यासाठी नागपूरमध्ये एक कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याची योजना महिंद्रा आखत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता, उपलब्ध संधी आणि संबंधित प्रक्रिया याबाबतची अधिक माहिती प्रकल्प जसजसा पुढे जाईल, तसतशी दिली जाईल.

Post a Comment

0 Comments