नागपूर 07.09. 2026 : नागपूरच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये रस्त्यांच्या गंभीर समस्येवरून प्रशासकीय अनास्थेविरोधात जनआक्रोश उफाळून आला आहे. एनआयटी (NIT) आणि स्थानिक प्रभावशाली लोकांच्या संगनमताने ३० फुटांचा स्वीकृत रस्ता गायब झाल्याचा गंभीर आरोप करत प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक शैलेश पांडे आज बेमुदत उपोषणावर बसले आहेत. या आंदोलनामुळे नागपूर सुधार प्रन्यासच्या (NIT) कारभारावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
३० फुटांचा रस्ता कागदावर, प्रत्यक्षात गायब:
एकता नगरमधील नर्मदा सोसायटी हे अधिकृत मंजूर (Sanctioned) लेआऊट आहे. या लेआऊटमधील ३० फुटांचा मुख्य सार्वजनिक रस्ता नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी आणि काही स्थानिक प्रभावशाली लोकांनी संगनमत करून गिळंकृत केल्याचा आरोप शैलेश पांडे यांनी केला आहे. हा रस्ता तातडीने शोधून काढून नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली आहे.
७०० ते ८०० मीटरच्या अपूर्ण रस्त्यामुळे कोंडी:
हेरिटेज स्कूलजवळून उत्थान नगरकडे जाणारा सुमारे ७०० ते ८०० मीटरचा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकांना थेट आणि सुलभ मार्ग उपलब्ध होऊन वेळ आणि इंधनाची मोठी बचत होईल. परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर भविष्यात पायी चालणेही अशक्य होईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
गोधनी ते गोरेवाडा मार्गावरील वाहतुकीला दिलासा आवश्यक:
सध्या गोधनी मार्गावर दररोज भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अपूर्ण असलेला हा मार्ग गोधनी ते गोरेवाडा टॉवर रोडला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. हा जोड रस्ता तयार झाल्यास संपूर्ण परिसरासाठी तो वरदान ठरेल आणि गोधनी मार्गावरील वाहतूक कोंडी कायमची फुटेल.
नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांचा संथ कारभार आणि निष्काळजीपणामुळेच हा जनहिताचा रस्ता रखडला असून, हे थेट प्रशासनाचे अपयश असल्याचा घणाघात नगरसेवक शैलेश पांडे यांनी केला आहे. जोपर्यंत गायब रस्ता खुला केला जात नाही आणि रखडलेले बांधकाम त्वरित सुरू करण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

0 Comments