थोडक्यात पण महत्त्वाचे
शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (एसएमएचआरसी), एआयएचईआर (डीयू) यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्नेहमिलन उपक्रमाचा सुमारे 350 आशा वर्कर्स आणि समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांना लाभ.
नागपूर : आशा वर्कर्स आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या कामाची दखल घेत अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (एआयएचईआर), अभिमत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (एसएमएचआरसी) यांच्या वतीने वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल आणि ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र (RHTC), कोराडी येथे दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे 350 आशा वर्कर्स आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना लाभ झाला.
या उपक्रमांतर्गत, शालिनीताई मेघे हॉस्पिटल कडून आशा वर्कर्सना मोफत फॅमिली हेल्थ कार्ड, KOL हेल्थ कार्ड आणि सन्मानचिन्हे देण्यात येत आहेत. आरोग्य सेवांमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आशा वर्कर्सच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. निलेश अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, एआयएचईआर (डीयू) यांनी अदाणी फाउंडेशनच्या ‘सेवा ही साधना है’ या विचाराचा पुनरुच्चार केला. समाजासाठी केलेली सेवा ही प्रत्यक्ष कृतीतून दिसली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शालिनीताई मेघे हॉस्पिटल रुग्णांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, औषधांवर 55 टक्क्यांपर्यंत सवलत आणि आयुष्मान भारत (PMJAY) योजनेच्या दरात उपचारांचा समावेश आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. राजसी सेनगुप्ता, प्रोफेसर आणि प्रसूती व स्त्रीरोग विभाग प्रमुख यांनी सुरक्षित गर्भधारणा आणि मातृत्वासाठी आशा वर्कर्स बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले. गर्भवती महिलांची नियमित तपासणी करणे, रुग्णालयात प्रसूतीसाठी प्रोत्साहित करणे, आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि गरजेनुसार वेळेवर रुग्णालयात पाठवणे, यामध्ये आशा वर्कर्सचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शालिनीताई मेघे हॉस्पिटलच्या ‘सुमन कार्ड’ या मातृत्व आरोग्य योजनेची माहिती दिली.
या कार्डमध्ये गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंतच्या आरोग्य सेवांचा समावेश आहे. यामध्ये गर्भावस्थेतील सर्व आवश्यक तपासण्या आणि सामान्य प्रसूतीची सुविधा केवळ 5,500 रुपयांत उपलब्ध आहे. तर खासगी वॉर्डमध्ये प्रसूतीची सुविधा देणारे ‘सुमन प्रीमियम कार्ड’ 15,000 रुपयांत उपलब्ध आहे. त्यामुळे महिलांना दर्जेदार मातृत्व आरोग्य सेवा अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत आहेत.
डॉ. नरेश गिल, उपसंचालक (कम्युनिटी सर्व्हिसेस) यांनी फॅमिली हेल्थ कार्डचे फायदे सांगितले. या कार्डमुळे आशा वर्कर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य माहिती आणि संस्थात्मक सहकार्य मिळणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आरोग्य सेवांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकेल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सहभागी महिलांना शालिनीताई मेघे हॉस्पिटल मधील विविध विशेष आरोग्य सेवांची माहितीही देण्यात आली. डॉ. मिनाक्षी पौनिकर यांनी रुग्णालयातील IVF आणि वंध्यत्व उपचार सेवांची माहिती दिली. तर डॉ. कुश झुनझुनवाला, प्राध्यापक व बालरोग विभागप्रमुख आणि डॉ. इशानी अरोरा, सहयोगी प्राध्यापक यांनी बालरोग विभागातील सुविधांची माहिती दिली. यामध्ये विशेषतः 22 बेडचे नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग (NICU) आणि सिकल सेल आजारावरील विशेष उपचार सुविधांचा समावेश आहे.
या स्नेहमिलन कार्यक्रमांच्या माध्यमातून एसएमएचआरसी आणि एआयएचईआर (डीयू) यांनी आशा वर्कर्ससोबतचे आपले संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आशा वर्कर्स महत्त्वाची भूमिका बजावतात, हे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले. केवळ सन्मान करण्यापुरता मर्यादित न राहता, त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सुरक्षित मातृत्व, निरोगी बालपण आणि सुदृढ समाज घडवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
‘सेवा ही साधना है’ या विचाराला अनुसरून शालिनीताई मेघे हॉस्पिटल समाजाची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. समाजाप्रती असलेली काळजी आणि बांधिलकी प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याचे काम हॉस्पिटल करत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासक डॉ. सोनिया खत्री आणि सुश्री नंदिनी गाडगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

0 Comments