थोडक्यात पण महत्त्वाचे
नाथ संप्रदायासह वारकरी व दत्तमार्गीय भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; २२ नोव्हेंबरला धार्मिक ऐक्याचा जागर
अकोला : नाथ संप्रदायाचे आराध्य दैवत, परमपूज्य श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी अकोला शहरात भव्य-दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याच्या माध्यमातून नाथपंथाची गौरवशाली परंपरा, संतविचार, भक्ती, साधना आणि सामाजिक एकतेचा संदेश जनमानसात पोहोचणार आहे. या शोभायात्रेत नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्तमार्गीय भक्त, साधू-संत, महाराज, कीर्तनकार, भजनी मंडळे आणि सर्व भाविकांनी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन गुरु गोरक्षनाथ शोभायात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
शोभायात्रेला सायंकाळी ५ वाजता श्री बाराभाई गणपती मंदिर, जय हिंद चौक, जुने शहर, अकोला येथून प्रारंभ होणार आहे. शोभायात्रेचा मार्ग श्री बाराभाई गणपती मंदिर येथून श्री राजराजेश्वर चौक, जय हिंद चौक, सिटी कोतवाली, गांधी चौक, तहसील चौक, बालाजी मंदिर मार्गे गणेश घाट येथे समारोप असा निश्चित करण्यात आला आहे. समारोपानंतर गणेश घाट येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरु गोरक्षनाथ महाराज यांनी दिलेला अध्यात्म, साधना, सदाचार, मानवसेवा आणि आत्मोन्नतीचा संदेश आजही समाजाला योग्य दिशा देणारा आहे. नाथपंथाची परंपरा ही केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नसून ती समाजाला एकत्र आणणारी, माणुसकीची शिकवण देणारी आणि सर्वांना समानतेचा विचार देणारी आहे. त्यामुळे या प्रकट दिनानिमित्त आयोजित शोभायात्रेत विविध संतपरंपरा आणि संप्रदायांनी एकत्र येऊन धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि दत्तमार्गीय परंपरा या भक्ती, नामस्मरण, गुरुभक्ती आणि मानवसेवेच्या विचारांनी समृद्ध आहेत. या सर्व परंपरांचा संगम अकोल्यातील शोभायात्रेत घडावा आणि नाथपंथाची पताका अधिक उंच फडकावी, यासाठी साधू-संत, महाराज, वारकरी दिंड्या, भजनी मंडळे आणि नाथभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
'एक दिवस आपल्या गुरूंसाठी, एक दिवस आपल्या समाजासाठी!' या प्रेरणादायी भावनेतून सर्वांनी एकत्र येत गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या प्रकट दिनाचा उत्सव भक्तिभावाने आणि एकजुटीने साजरा करावा. ही शोभायात्रा केवळ मिरवणूक न ठरता नाथपंथाची गौरवशाली परंपरा, संतविचार आणि सामाजिक एकात्मतेचा भव्य जागर ठरावा, हीच आयोजकांची भावना आहे.
समस्त नाथ समाज, नाथपंथीय, वारकरी, दत्तमार्गीय भक्त, धार्मिक संस्था, भजनी मंडळे आणि सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन गुरु गोरक्षनाथ शोभायात्रा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

0 Comments