थोडक्यात पण महत्वाचे
कोटा फॅक्टरीनंतर, नेटफ्लिक्स आणि टीव्हीएफ आणखी एक शाळेवर आधारित कथा सादर करत आहेत, जी भारतातील प्रसिद्ध शिक्षक आणि मोठे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्पित आहे.
28 फेब्रुवारी 2026 : हॅलो बच्चो–हा फक्त वर्गात उच्चारला जाणारा शब्द नाही, तर नवीन विचार आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. नेटफ्लिक्सने आपल्या नव्या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ही सिरीज शिक्षक अलख पांडे यांच्या खास प्रवासावर आधारित आहे, ज्यांचा प्रभाव केवळ वर्गापुरता मर्यादित राहिला नाही, तर भारतातील अनेक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचला आहे. 6 मार्च रोजी प्रीमियर होणारी ही सिरीज अशा विद्यार्थ्यांची कथा सांगते ज्यांनी आपली स्वप्ने कधीही सोडली नाहीत. त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासामुळे त्यांना पुढे जाण्याची ताकद आणि धैर्य मिळाले.
एका साध्या वर्गातील छोट्या सुरुवातीपासून सुरू झालेली ही कथा पुढे एक मोठी चळवळ बनते. ही पहल शहरांपासून गावांपर्यंत आणि छोट्या गल्लीबोळांपर्यंत पोहोचते. ट्रेलरमध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कथा दाखवल्या आहेत, पण त्यांना एकत्र जोडणारे एकच स्वप्न आहे. एका मुलाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, एका मुलीला शिक्षण पूर्ण करण्यासाठी समाजाच्या अपेक्षा पेलाव्या लागतात, तर आणखी एका मुलाला क्रिकेटचे स्वप्न बाजूला ठेवून घरची जबाबदारी सांभाळावी लागते. त्यांच्या कथा सांगतात की शिक्षण हे काही मोजक्या लोकांचे विशेषाधिकार नाही, तर प्रत्येक मुलाचा हक्क आहे. योग्य मार्गदर्शन आणि विश्वास मिळाला तर शिक्षण आयुष्य बदलू शकते.
प्रतिश मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली ही सिरीज बनवण्यात आली आहे. मुख्य भूमिका विनीत कुमार सिंग यांनी साकारली असून, विक्रम कोचर आणि गिरीजा ओक गोडबोले यांच्यासह इतर कलाकारही आहेत. सतेन्द्र सोनी, सोनू कुमार यादव, अंशुल डोगरा, समता सुदिक्षा, वरुण बुद्धदेव आणि नमन जैन यांनीही प्रभावी अभिनय केला आहे. या सर्वांनी पाच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या आणि प्रेरणादायी कथा साकारल्या आहेत. हे विद्यार्थी प्रत्येक अडचणीचा सामना करत आपल्या स्वप्नांकडे ठामपणे वाटचाल करतात.
ही सिरीज अभिषेक यादव यांनी तयार केली असून, अंकित यादव, वर्नाली आणि संदीप सिंग यांनी कथा लेखन केले आहे. हॅलो बच्चो नेटफ्लिक्स आणि टीव्हीएफ यांचा आणखी एक संयुक्त प्रकल्प आहे, जी तरुण भारताचे स्वप्नं आणि चिकाटीवर आधारित कथा प्रेक्षकांसमोर मांडते.
टीव्हीएफचे संस्थापक आणि सीईओ अरुणाभ कुमार यांनी सांगितले, “हॅलो बच्चो आमच्यासाठी खूप खास सिरीज आहे. यात दोन कथा एकत्र दाखविल्या आहेत – एक शिक्षक जो जाणतो की शिकण्याची इच्छा सर्वत्र असते, आणि दुसरी त्या विद्यार्थ्यांची जी कठीण स्पर्धा आणि वैयक्तिक अडचणींशी सामना करत आहेत. वेगवेगळ्या आणि वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांच्या खऱ्या कथा आणि त्यांच्यावर शिक्षकाने दाखवलेला विश्वास हा या मालिकेतील सर्वात भावनिक भाग आहे. ही सिरीज भारतातील वेगवेगळ्या भावना दाखवते आणि सांगते की जेव्हा विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येतात, तेव्हा ते काहीतरी खास घडवू शकतात. नेटफ्लिक्ससोबत मिळून ही भावनिक आणि हृदयस्पर्शी कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
विनीत कुमार सिंग म्हणाले, “हॅलो बच्चो खास आहे कारण ती दोन प्रवासांची कथा एकाच भावनेतून सांगते – एक शिक्षक जो आपला उद्देश शोधत आहे, आणि विद्यार्थी जे स्वतःवर विश्वास ठेवायला शिकत आहेत. एक अभिनेता म्हणून, लाखो लोकांवर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारणे ही मोठी जबाबदारी होती, पण त्याचबरोबर ती कृतज्ञतेची भावना देणारीही होती. मी ही भूमिका पूर्ण आदराने साकारली आणि माझ्याकडून शक्य तेवढा सर्वोत्तम प्रयत्न केला. मला आशा आहे की प्रेक्षकांना या प्रवासात उब, संघर्ष आणि आशा जाणवेल, आणि देशभरातील अनेक विद्यार्थ्यांचे अनुभव त्यांना या कथेत पाहायला मिळतील.”
तान्या बामी सांगतात, “हॅलो बच्चो या सिरीजच्या माध्यमातून आम्ही भारतातील तरुणांच्या खऱ्या आयुष्यातील आव्हानांना समोर आणत आहोत. ही सिरीज लाखो विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा, मेहनत आणि जिद्दीची गोष्ट सांगते, जी कठीण परिस्थितींवर मात करून एकमेकांना आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देते, तसेच पालक आणि शिक्षकांसाठीही अभिमानाची बाब आहेत. ही सिरीज टीव्हीएफच्या टीममधील प्रतिश यांनी प्रामाणिक पण सिनेमॅटिक शैलीत सादर केली आहे. टीव्हीएफ हे आमचे दीर्घकालीन भागीदार आहेत, ज्यांच्यासोबत आम्ही ‘कोटा फॅक्टरी’ ही सिरीज केली होती आणि भविष्यातही अशाच अनेक प्रेरणादायी आणि दमदार कथा घेऊन येण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”
हॅलो बच्चो 6 मार्च रोजी फक्त नेटफ्लिक्स वर प्रीमियर होईल.
क्रेडिट्स:
• दिग्दर्शक: प्रतिश मेहता
• निर्मित: अभिषेक यादव
• लेखन: अभिषेक यादव, अंकित यादव, वर्नाली, संदीप सिंग
• कार्यकारी निर्माते: विजय कोशी, श्रेयांश पांडे
• कलाकार: विनीत कुमार सिंग, विक्रम कोचर, गिरीजा ओक गोडबोले

0 Comments