नागपूर, एप्रिल 27, 2026 : नागपूर येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका 46 वर्षीय महिलेवर दुर्मिळ आणि अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून यशस्वी उपचार केले. या महिलेला मेसोथेलिओमा हा फुफ्फुसाचा एक दुर्मिळ आणि आक्रमक प्रकारचा कर्करोग झाला होता. उपचारादरम्यान तिचे कर्करोगग्रस्त संपूर्ण फुफ्फुस शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आले. रुग्ण गेल्या तीन महिन्यांपासून सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि कधी कधी खोकल्यासोबत रक्त येणे अशा तक्रारींसह मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूर येथे दाखल झाली होती.
सविस्तर तपासणीत तिच्या उजव्या फुफ्फुसात मेसोथेलिओमा असल्याचे निदान झाले. हा एक दुर्मिळ कर्करोग असून तो फुफ्फुसाच्या ऊतींमध्ये न वाढता, फुफ्फुसाभोवती असलेल्या पातळ आवरणात तयार होतो. सामान्य फुफ्फुसाच्या कर्करोगात फुफ्फुसाचा फक्त काही भाग काढला जातो. पण मेसोथेलिओमा हा कर्करोग फुफ्फुसाच्या आवरणावर पसरत असल्यामुळे साधी शस्त्रक्रिया करणे कठीण होते आणि अनेकदा मोठी व अधिक जटिल शस्त्रक्रिया करावी लागते.
डॉ. अभिनव देशपांडे, डायरेक्टर, सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक ऑन्को-सर्जरी, मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूर यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने ही जटिल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेमध्ये प्रभावित फुफ्फुसासोबत त्याच्या आसपासचे ऊतक (टिश्यू) आणि जवळील लिम्फ नोड्स काढण्यात आले. छातीतील कर्करोगाच्या उपचारांमध्ये ही अत्यंत मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया मानली जाते, ज्यासाठी अतिशय काळजीपूर्वक नियोजन आणि विविध तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये चांगला समन्वय असणे खूप आवश्यक असते.
या केसबद्दल बोलताना डॉ. अभिनव देशपांडे, डायरेक्टर, सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक ऑन्को-सर्जरी, मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूर म्हणाले, “ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती, ज्यामध्ये संपूर्ण कर्करोगग्रस्त फुफ्फुस आणि आसपासचे ऊतक काढावे लागले. अशा शस्त्रक्रियांमध्ये धोका जास्त असतो आणि त्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक नियोजन तसेच शस्त्रक्रिया, क्रिटिकल केअर आणि श्वसन तज्ज्ञांमध्ये समन्वय आवश्यक असतो. शस्त्रक्रियेनंतरचे पहिले काही आठवडे खूप महत्त्वाचे असतात, कारण शरीराला एका फुफ्फुसावर काम करण्याची सवय लावावी लागते.
डॉक्टरांच्या सतत देखरेखीखाली, लवकर चालणे-फिरणे सुरू करून आणि श्वसनाशी संबंधित फिजिओथेरपीच्या मदतीने रुग्णाचे उरलेले फुफ्फुस हळूहळू काम करण्यास तयार होते. त्यामुळे रुग्णाची ताकद परत येते आणि रुग्ण पुन्हा सामान्य जीवन जगू लागतो. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली असून ट्यूमर पूर्णपणे काढण्यात आला आहे. रुग्णाची प्रकृती आता सुधारत आहे आणि पुढील कर्करोगाच्या उपचारासाठी तिच्यावर केमोथेरपी सुरू आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे नागपूर येथील मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटलमध्ये प्रगत ऑन्कोलॉजिकल आणि छातीच्या शस्त्रक्रियेच्या (थोरॅसिक सर्जरी) सुविधा उपलब्ध होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुंतागुंतीचे आणि दुर्मिळ कर्करोग असलेल्या रुग्णांना आता आपल्या शहराजवळच अत्याधुनिक आणि विशेष उपचार मिळू शकतात.

0 Comments