नागपुर : वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वाचे यश मिळवत, वानाडोंगरी येथील 1020 बेड्सच्या ‘शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील 51 वर्षीय महिलेवर ‘फिओक्रोमोसायटोमा’ या दुर्मिळ आणि धोकादायक आजारावर यशस्वी उपचार केले आहेत. या यशामुळे हॉस्पिटलने प्रगत एंडोक्राइन शस्त्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
रुग्णाला सुरुवातीला पोटदुखी, तीव्र हृदयाची धडधड, वारंवार डोकेदुखी आणि रक्तदाबात अचानक चढ-उतार अशी लक्षणे दिसत होती. सविस्तर तपासणीत अॅड्रिनल ग्रंथीत ट्युमर आढळला, जो अॅड्रेनालिनसारखे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार करत होता. ज्यामुळे रुग्णाचा रक्तदाब अचानक 250 मिमीएचजीपर्यंत खूप वाढत होता. ही स्थिती खूप धोकादायक असून जीवाला धोका निर्माण करू शकते.
फिओक्रोमोसायटोमा हा गुंतागुंतीचा आजार असल्यामुळे शस्त्रक्रिया, अॅकनेस्थेसियोलॉजी, मेडिसिन आणि एंडोक्राइनोलॉजी अशा विविध विभागांतील तज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली. रुग्णाचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी शस्त्रक्रियेपूर्वी अल्फा आणि बीटा ब्लॉकर औषधांनी विशेष तयारी करण्यात आली. सर्व काळजी घेतल्यानंतरही तिचा रक्तदाब स्थिर राहत नव्हता आणि तो 160 ते 240 मिमीएचजी दरम्यान बदलत होता, त्यामुळे ही केस किती गंभीर आहे हे स्पष्ट होत होते.
शस्त्रक्रिया विभागाचे प्रोफेसर डॉ. प्रवीण निखाडे म्हणाले, “फिओक्रोमोसायटोमा हा दुर्मिळ पण खूप धोकादायक ट्युमर आहे. वेळेवर उपचार न केल्यास हृदय आणि मेंदूशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.”
ही शस्त्रक्रिया खूप आव्हानात्मक होती. ट्युमर काढताना रुग्णाचा रक्तदाब सतत बदलत होता. अॅड्रिनल व्हेन क्लिप लावल्यानंतर रक्तदाब अचानक 120 मिमीएचजी पेक्षा खाली गेला आणि तातडीने उपचार करावे लागले.
अॅनेस्थेसिया विभागाच्या प्रोफेसर आणि प्रमुख डॉ. अंजली बोरकर म्हणाल्या, “अशा प्रकरणांमध्ये रुग्णावर सतत लक्ष ठेवावे लागते, गरजेनुसार लगेच औषधांमध्ये बदल करावे लागतात आणि शस्त्रक्रिया टीमसोबत उत्तम समन्वय ठेवावा लागतो. अचूक अॅनेस्थेसिया नियंत्रण खूप महत्त्वाचे असते.”
या सर्व जोखमींवर मात करत, टीमने लॅप्रोस्कोपिक पद्धतीने उजव्या बाजूची अॅड्रिनल ग्रंथी काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये ही अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया ठरली. ही कमी जखम होणारी (मिनिमली इनव्हेसिव्ह) प्रक्रिया असल्यामुळे खूप अचूकता आवश्यक होती, ट्युमरला कमी हाताळणे आणि योग्य वेळी अॅड्रिनल व्हेन बांधणे गरजेचे होते. शस्त्रक्रिया कमी रक्तस्रावात आणि रुग्णाची स्थिती स्थिर ठेवून पूर्ण करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला आयसीयू आणि वॉर्डमध्ये बारकाईने निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. तिची प्रकृती हळूहळू सुधारली, वेदना नियंत्रणात होत्या आणि ती लवकर चालू-फिरू लागली. डिस्चार्जच्या वेळी तिचा रक्तदाब 120/80 मिमीएचजी आणि नाडी 80 प्रति मिनिट इतकी सामान्य झाली होती. तिला कोणतीही रक्तदाबाची औषधे घ्यावी लागली नाहीत , यावरून ती पूर्णपणे बरी झाल्याचे दिसून आले.
ही शस्त्रक्रिया डॉ. प्रवीण निखाडे, डॉ. अमित गिलानी आणि डॉ. अंजली माने यांनी केली. त्यांना शस्त्रक्रिया विभागातील रेसिडेंट डॉक्टर डॉ. रुपेश, जोबेन, अंजली, संदीप, आयेशा, जानिल, राइमा आणि श्रावंती यांनी सहकार्य केले. ही संपूर्ण प्रक्रिया डॉ. अनिल अकुलवार यांच्या देखरेखीखाली पार पडली.
अॅलनेस्थेसिया उपचाराची जबाबदारी डॉ. प्रतिभा देशमुख, डॉ. अंजली बोरकर आणि डॉ. प्रियंका पराते आणि त्यांच्या टीमने यशस्वीपणे सांभाळली.
एंडोक्राइनोलॉजीचे व्यवस्थापन डॉ. पंकज फेरवाणी यांनी केले. शस्त्रक्रियेपूर्व व नंतरची वैद्यकीय काळजी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद भृशुंबडी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने घेतली, तर आयसीयूची जबाबदारी डॉ. अमित सुतार यांच्या टीमने सांभाळली.
संपूर्ण उपचार प्रक्रियेला एकूण मार्गदर्शन जनरल सर्जरी विभागाचे प्रोफेसर आणि प्रमुख डॉ. राजीव सोनारकर यांनी केले. ओटी, आयसीयू आणि वॉर्डमधील नर्सिंग टीम तसेच पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी रुग्णाला 24 तास सेवा दिली. याद्वारे त्यांनी रुग्णांची सुरक्षा आणि त्यांच्या प्रकृती सुधारणेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत गावंडे यांनी सांगितले की, ही संपूर्ण शस्त्रक्रिया प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (PMJAY) पूर्णपणे मोफत करण्यात आली. कॅशलेस प्रक्रिया श्री. अहमिंद्र जैन यांनी, डॉ. सुधीर सिंग (एएमएस) यांच्या मार्गदर्शनाखाली, अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडली.
डॉ. राजीव सोनारकर म्हणाले, “ही केस दाखवते की विविध तज्ज्ञांची एकत्रित टीम, प्रगत लॅप्रोस्कोपिक कौशल्य आणि अचूक अॅमनेस्थेसिया व्यवस्थापन यांच्या मदतीने अशा गुंतागुंतीच्या एंडोक्राइन ट्युमरवर यशस्वी उपचार करता येतात.”
या यशाबद्दल अभिमान व्यक्त करताना, डीएमआयएचईआर नागपूर कॅम्पसचे संचालक डॉ. अनुप मरार म्हणाले, “अशा उच्च जोखमीच्या रुग्णावर यशस्वीपणे उपचार करणे हे आमच्या हॉस्पिटलच्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवेचा आणि गरजू रुग्णांना प्रगत व रुग्णकेंद्रीत उपचार देण्याच्या बांधिलकीचा पुरावा आहे.”
डॉ. निलेश अग्रवाल, सीओओ, डीएमआयएचईआर (डीयू) म्हणाले, “ही कामगिरी शालिनीताई मेघे हॉस्पिटलसाठी कमी जखम होणाऱ्या (मिनिमली इन्व्हेसिव्ह ) एंडोक्राइन शस्त्रक्रियेत मोठी प्रगती आहे आणि सर्वांना दर्जेदार व सहज उपलब्ध आरोग्यसेवा देण्याच्या आमच्या उद्दिष्टाला अधिक बळकटी देते.”

0 Comments