राष्ट्रीय : एचडीएफसी बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि व्यापारातील चढ-उतार असूनही मजबूत आर्थिक कामगिरी केली. या आर्थिक वर्षात बँकेचे कर्जवाटप 12.1 टक्क्यांनी वाढून 29.37 लाख कोटींवर, तर ठेवी 14.4 टक्क्यांनी वाढून 31.05 लाख कोटींवर पोहोचले. निव्वळ महसूल 1.91 लाख कोटी आणि करानंतरचा निव्वळ नफा 10.9 टक्क्यांनी वाढून 74,671 कोटी झाला. यासोबतच ग्राहकांना अधिक सुरक्षित, जलद आणि सोपी बँकिंग सेवा देण्यासाठी बँकेने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि मजबूत व्यवस्थापनावर विशेष भर दिला.
एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष केकी एम. मिस्त्री म्हणाले, " जागतिक पातळीवर अनेक आव्हाने असली तरी भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. एचडीएफसी लिमिटेडच्या विलीनीकरणामुळे गृहनिर्माण कर्ज व्यवसायाला चांगला फायदा झाला आहे. भविष्यात बँकिंग क्षेत्रात जनरेटिव्ह एआयची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार असून, ग्राहकांचा विश्वास, पारदर्शकता आणि चांगले व्यवस्थापन कायम ठेवत आम्ही नावीन्यपूर्ण सेवा देत राहू. तसेच, एचडीएफसी बँकेचे एमडी आणि सीईओ शशिधर जगदीशन म्हणाले, " बँकेने मजबूत आर्थिक वाढीसोबत उच्च दर्जाची मालमत्ता गुणवत्ता कायम राखली आहे. ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी तसेच बँकेचे काम अधिक जलद आणि सोपे करण्यासाठी आम्ही एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर करत आहोत. भविष्यातही सुरक्षित, वेगवान आणि अखंड बँकिंग सेवा देण्यासाठी सातत्याने गुंतवणूक करत राहू."
एचडीएफसी बँकेने एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचा आयपीओ यशस्वीपणे सूचीबद्ध करून कॉर्पोरेट गव्हर्नन्सला अधिक बळकटी दिली आहे. बँकेच्या 'परिवर्तन' या सीएसआर उपक्रमांतर्गत 10.7 कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत विविध विकास उपक्रम पोहोचले असून, 11 हजारांहून अधिक गावांमध्ये विविध विकास कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. भविष्यातही नावीन्यपूर्ण उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञान, जबाबदार बँकिंग, ग्राहककेंद्रित सेवा आणि मजबूत व्यवस्थापनाच्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्यावर बँकेचा भर राहणार आहे.

0 Comments