नागपूर, जुलै 30, 2026 : अत्यंत कठीण परिस्थितीत उत्कृष्ट वैद्यकीय कौशल्य आणि विविध विभागांतील डॉक्टरांच्या समन्वयातून मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर येथील डॉक्टरांनी एका 24 वर्षीय गर्भवती महिलेचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचवला. रस्ते अपघातानंतर करण्यात आलेल्या या दुर्मिळ दुहेरी आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे आई आणि बाळाला नवीन जीवन मिळाले.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील तुर्कीखापा येथील रहिवासी योगिता साहू या 34 आठवड्यांच्या गर्भवती होत्या. नागपूर–छिंदवाडा महामार्गावर झालेल्या भीषण रस्ता अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करत असताना एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर त्यांना तातडीने मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूरच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले.
मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर येथील आपत्कालीन टीमने त्वरित उपचार सुरू केले. मेंदूच्या सीटी स्कॅनमध्ये मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव (एक्स्ट्राड्युरल हेमॅटोमा) झाल्याचे आढळले. ही गंभीर स्थिती लक्षात घेता तातडीने न्यूरोसर्जरी करणे आवश्यक होते. रुग्णाची प्रकृती स्थिर केल्यानंतर आणि कुटुंबीयांना परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर, डॉक्टरांच्या टीमने एकाच वेळी दोन जीव वाचवणाऱ्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या मध्ये मेंदूतील साचलेली रक्ताची गाठ काढण्यासाठी तातडीची मेंदूची शस्त्रक्रिया आणि बाळाला सुरक्षित जन्म देण्यासाठी आपत्कालीन सिझेरियन प्रसूती या दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी करण्यात आल्या.
या प्रकरणाबाबत बोलताना मैक्स हॉस्पिटल, नागपूर येथील ब्रेन अँड स्पाइन सर्जरी विभागाचे डायरेक्टर डॉ. हुसेन भाटी म्हणाले:“एक्स्ट्राड्युरल हेमॅटोमा ही मेंदूशी संबंधित एक गंभीर आपत्कालीन स्थिती आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास ती काही वेळातच जीवघेणी ठरू शकते. या प्रकरणात आम्ही एका नव्हे तर दोन जीवांसाठी लढत होतो. वेळेत झालेले निदान, तातडीने करण्यात आलेली शस्त्रक्रिया आणि विविध वैद्यकीय विभागांमधील उत्तम समन्वय यामुळे हे यश शक्य झाले. अशा घटना आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये एकत्रित नियोजन आणि सज्जतेचे महत्त्व अधोरेखित करतात.”
गर्भावस्थेचा कालावधी अंतिम टप्प्यात असल्यामुळे, शस्त्रक्रिया टीमने प्रथम सिझेरियन प्रसूती करून बाळाला सुरक्षितपणे जन्म दिला. त्यानंतर गर्भाशय बंद करण्यात आले. पुढे मेंदूतील रक्तस्रावावर उपचार करण्यासाठी क्रॅनिओटॉमी (मेंदूची शस्त्रक्रिया) करण्यात आली आणि दोन्ही शस्त्रक्रियांच्या जागा सुरक्षितपणे बंद करण्यात आल्या. योगिता यांनी 2.1 किलो वजनाच्या निरोगी मुलीला जन्म दिला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला तीन दिवस अतिदक्षता विभागात (ICU) ठेवून त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. काही दिवसांतच त्यांना शुद्ध आली आणि त्यांची प्रकृती वेगाने सुधारली. एका आठवड्यानंतर आई आणि बाळ दोघांनाही स्थिर व निरोगी अवस्थेत रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
मैक्स हॉस्पिटल, नागपूर येथील ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी विभागाच्या प्रिन्सिपल कन्सल्टंट डॉ. साक्षी बन्सल म्हणाल्या:“हे संपूर्ण वैद्यकीय टीमसाठी अत्यंत आव्हानात्मक प्रकरण होते. प्रत्येक निर्णय घेताना आई आणि तिच्या पोटातील बाळाची सुरक्षितता यांचा समतोल राखणे आवश्यक होते. आज आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत, हेच संपूर्ण टीमसाठी सर्वात मोठे समाधान आणि यश आहे.” मैक्स हॉस्पिटल, नागपूर येथील पेडियाट्रिक्स अँड निओनेटोलॉजी विभागाचे सीनियर कंसल्टेंट डॉ. कौस्तुभ बहातकर म्हणाले: “बाळाचा जन्म अत्यंत जोखमीच्या आपत्कालीन परिस्थितीत झाला होता. बाळ ३४ आठवड्यांचे (प्री-टर्म) असल्याने त्याला तातडीने विशेष नवजात काळजी आणि तपासणीची आवश्यकता होती.
जन्मानंतर लगेचच बाळाला नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयूमध्ये) दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर विशेष उपचार आणि सतत देखरेख ठेवण्यात आली. जन्माच्या पहिल्या क्षणापासूनच आमच्या टीमने बाळाची प्रकृती स्थिर करण्यासाठी त्वरित उपचार सुरू केले, सतत निरीक्षण केले आणि आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली. आज बाळाची चांगली वाढ होताना पाहणे अत्यंत समाधानकारक आहे. अशा गुंतागुंतीच्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये आई आणि नवजात बाळासाठी समन्वयाने दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांचे महत्त्व या प्रकरणातून स्पष्ट होते.”
हे प्रकरण मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर येथील विविध वैद्यकीय विभागांमधील उत्कृष्ट समन्वय आणि टीमवर्कचे उदाहरण आहे. अनेक विभागांच्या तज्ज्ञांनी एकत्रितपणे प्रयत्न करून अत्यंत कठीण परिस्थितीत आई आणि बाळाचे प्राण वाचवले.

0 Comments