मुंबई, 30 जुलै 2026 : हंगामा ओटीटी ने नुकतीच आपली नवीन ओरिजिनल मालिका ‘सर्व्हिस गर्ल’ प्रदर्शित केली आहे. ही एक थरारक क्राईम ड्रामा मालिका असून, यात एआयच्या मदतीने तयार केले जाणारे डीपफेक व्हिडिओ आणि ऑनलाइन ओळखीच्या चोरीमुळे होणारे गंभीर परिणाम दाखवण्यात आले आहेत. डिजिटल युगातील वाढत्या सायबर धोक्यांवर प्रकाश टाकणारी ही मालिका दाखवते की एआयचा चुकीचा वापर केल्यास एखाद्या व्यक्तीचे आयुष्य, प्रतिष्ठा आणि नातेसंबंधांवर किती मोठा परिणाम होऊ शकतो.
दिव्या ही या कथेची मुख्य व्यक्तिरेखा आहे. ती एका छोट्या शहरात राहणारी तरुणी आहे, जिथे आजही अनेक लोकांचे विचार पारंपरिक आहेत. तिच्या चेहऱ्याचा वापर करून तयार करण्यात आलेला एक अश्लील एआय डीपफेक व्हिडिओ व्हायरल होतो आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. एका रात्रीत तिचे लग्न, तिची प्रतिष्ठा आणि जवळच्या लोकांचा विश्वास ती गमावते. सायबर गुन्ह्याची शिकार होण्यासोबतच तिला समाजाच्या चुकीच्या निर्णयांचाही सामना करावा लागतो. लाज आणि समाजाच्या दबावाला बळी न पडता, दिव्या त्या खोट्या व्हिडिओमागचे सत्य शोधण्याचा निर्धार करते.
तपास करताना तिला एक मोठे सायबर गुन्हेगारी जाळे सापडते, जे बनावट ओळखींचा वापर करून महिलांचे शोषण करते आणि त्यांच्याकडून पैसे उकळते. स्वतःवरील आरोप दूर करण्यासाठी सुरू केलेला तिचा संघर्ष पुढे डिजिटल अत्याचाराचे वास्तव जगासमोर आणण्याच्या लढाईत बदलतो. ही मालिका दाखवते की एआय तंत्रज्ञान खूप उपयुक्त असले तरी, त्याचा गैरवापर झाल्यास तेच तंत्रज्ञान एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.
कथेतील आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे कंगना. ही भूमिका मल्लोबिका बॅनर्जीने साकारली आहे. कंगना ही एक धाडसी आणि महत्त्वाकांक्षी मॉडेल असून तिचे अभिनेत्री बनण्याचे स्वप्न आहे. निर्भय आणि जिद्दी असलेली कंगना मुंबईत दिव्याला भेटते आणि तिचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या सायबर गुन्हेगारी जाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी मजबूत साथ देते. तपास पुढे जात असताना, कंगनाचे धैर्य आणि जिद्द सत्य समोर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना मल्लोबिका बॅनर्जी म्हणाल्या, “कंगना ही धाडसी, निडर आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी मुलगी आहे. तिचे अभिनेत्री म्हणून मोठे यश मिळवण्याचे स्वप्न आहे. पण दिव्याची भेट झाल्यानंतर तिच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळते. सायबर गुन्ह्यामागील सत्य बाहेर आणण्यासाठी ती दिव्याला मदत करण्याचा निर्धार करते. ‘सर्व्हिस गर्ल’ या मालिकेतील मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे, यात इंटरनेटची अशी लपलेली बाजू दाखवण्यात आली आहे जी खऱ्या आयुष्यातही अस्तित्वात आहे. दररोज अनेक निरपराध लोक ऑनलाइन फसवणूक, चुकीची माहिती आणि बनावट कंटेंटचे बळी ठरतात. अशा गुन्ह्यांच्या पीडितांबद्दल प्रेक्षकांमध्ये अधिक जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण व्हावी, अशी माझी इच्छा आहे. वैयक्तिकरित्या मला कंगनाच्या निडर स्वभावाशी जोडलेपण वाटते, कारण परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य गोष्टीसाठी उभे राहण्यावर माझा नेहमी विश्वास आहे.”
या मालिकेत दिव्याची मुख्य भूमिका खुशी दुबेने साकारली असून, तिच्या भावनिक आणि प्रभावी अभिनयामुळे ही कथा अधिक परिणामकारक बनते. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना खुशी दुबे म्हणाली, “मी दिव्याची भूमिका साकारत आहे. ती एक साधी मुलगी आहे, जिचे लहान वयात लग्न होते. मात्र सायबर गुन्ह्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. एआय च्या मदतीने कोणीतरी तिच्या चेहऱ्याचा वापर करून तिची एक बनावट आणि आक्षेपार्ह प्रतिमा तयार करतो, ज्यामुळे समाजातील तिची प्रतिष्ठा खराब होते. ती हा फोटो माझा नाही असे सांगते, तरीही कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. अशा घटना आपण अनेकदा बातम्यांमध्ये ऐकतो. दुर्दैवाने, अशा भयानक सायबर गुन्ह्यांमुळे अनेक तरुणींनी आपले जीवनही संपवले आहे. हा खूप गंभीर विषय आहे. ही वेब सीरिज या संवेदनशील मुद्द्यावर प्रकाश टाकते आणि माझे पात्र अशा कठीण परिस्थितीशी कसे लढते आणि त्यातून बाहेर कसे येते, हे दाखवते.”
या मालिकेत निशाद वैद्यने जॅकी भैय्याची भूमिका साकारली आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी जॅकी नावाची भूमिका साकारत आहे, ज्याला सर्वजण ‘जॅकी भैया’ म्हणून ओळखतात. तो इंटरनेटवर चालणाऱ्या लाईव्ह कॅम सर्व्हिस व्यवसायाचा मुख्य सूत्रधार आहे. ऑनलाइन जगात हा एक वेगळ्या प्रकारचा आणि अनोखा व्यवसाय आहे. या व्यवसायासोबतच सुरू असलेल्या सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात दिव्या (खुशी दुबे) अडकते. त्यानंतर कथा पुढे जाते, जिथे दिव्या या बेकायदेशीर व्यवसायाचा पर्दाफाश करते आणि सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करते. माझ्यासाठी ही भूमिका खूप आव्हानात्मक होती, कारण संपूर्ण भूमिकेत मला अडखळत बोलण्याची शैली साकारावी लागली. ही भूमिका नैसर्गिक वाटावी यासाठी मी खूप सराव केला. प्रेक्षकांना माझा अभिनय आणि ही व्यक्तिरेखा नक्कीच आवडेल, अशी मला आशा आहे.”
आणखी एका नकारात्मक भूमिकेबद्दल अनुभव सांगताना जहांगीर खान म्हणाला, “एका नकारात्मक व्यक्तिरेखेची भूमिका साकारणे माझ्यासाठी खरोखरच एक खास अनुभव होता. ही भूमिका खूप आव्हानात्मक होते, कारण त्यामध्ये अनेक स्तर आणि गुंतागुंत आहेत. तो जॅकी भैय्याचा विश्वासू साथीदार आहे आणि या अनोख्या ऑनलाइन व्यवसायात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. खऱ्या आयुष्यात अशा बेकायदेशीर कामांना मी कधीही पाठिंबा देणार नाही किंवा त्याचे समर्थन करणार नाही. मात्र एक अभिनेता म्हणून अशा नकारात्मक व्यक्तिरेखा साकारणे खूप रंजक असते. अशा भूमिका मला मानवी स्वभावातील वेगवेगळ्या बाजू समजून घेण्याची आणि माझ्या अभिनयाच्या मर्यादांपलीकडे जाण्याची संधी देतात.”
सस्पेन्स, भावना आणि सामाजिक संदेश यांचा उत्तम संगम असलेली ‘सर्व्हिस गर्ल’ ही मालिका एआय च्या मदतीने होणाऱ्या वाढत्या सायबर गुन्ह्यांवर प्रकाश टाकते. अशा गुन्ह्यांमुळे पीडित व्यक्तींवर होणारा मानसिक आणि भावनिक परिणामही या मालिकेत प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. ही मालिका संघर्ष, न्याय आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज यावर एक महत्त्वपूर्ण संदेश देते. ‘सर्व्हिस गर्ल’ ही मालिका हंगामा ओटीटी सोबतच टाटा प्ले बिंग, वॉचो, बीएसएनएल, प्लेबॉक्स टीव्ही, रेलवायर ब्रॉडबँड, एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले आणि डोर टीव्ही वरही उपलब्ध असेल.

0 Comments