नागपूर, २-३ जुलै २०२६ : जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या Raising and Accelerating MSME Performance (RAMP) योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सी म्हणून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) ने फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) यांच्या सहकार्याने विदर्भ विभागातील MSME उद्द्योगांसाठी आयोजित दोन दिवसीय 6 वी रिव्हर्स बायर-सेलर मीट (RBSM) यशस्वीरित्या संपन्न केली.
२ ते ३ जुलै २०२६ दरम्यान नागपूर येथील ले मेरीडियन हॉटेलमध्ये पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक मेळाव्यात २१ देशांतील ५० आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ऑस्ट्रिया, रशिया, व्हिएतनाम, किर्गिझस्तान, मॉरिशस, इजिप्त, नेदरलँड्स, बेलारूस, कॅमेरून, श्रीलंका, यूएई, म्यानमार, टांझानिया, नेपाळ, रवांडा, युगांडा, घाना, इथिओपिया, नायजेरिया, बेनिन आणि केनिया या देशांचा समावेश होता.
या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील MSME उद्योगांना जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळविण्यास तसेच दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यावसायिक भागीदारी निर्माण करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले.
या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातील ४६० हून अधिक MSME उद्द्योगांनी सहभाग घेतला. अर्थपूर्ण आणि परिणामकारक संवाद वाढविण्याच्या उद्देशाने १,१०० हून अधिक संरचित B2B बैठका आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे प्रत्येक MSME उद्योगाला अनेक परदेशी खरेदीदारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. पहिल्या दिवशी २०० हून अधिक MSME उद्योगांनी, तर दुसऱ्या दिवशी सुमारे २६० MSME उद्योगांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचा समारोप अत्यंत सकारात्मक वातावरणात झाला. सहभागी MSME उद्योग आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार यांच्यामध्ये जवळपास १०० सामंजस्य करार (Deal Memorandums) करण्यात आले. या व्यवहारांमधून १८२ कोटींपेक्षा अधिक संभाव्य व्यापार संधी निर्माण होण्याची अपेक्षा असून, महाराष्ट्रातील उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत असलेली मजबूत मागणी अधोरेखित झाली आहे.
या RBSM चे प्रमुख उद्दिष्ट MSME उद्योगांची निर्यात तयारी वाढविणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश सुलभकरणे आणि त्यांची जागतिक स्पर्धात्मकता अधिक मजबूत करणे हे होते. हा उपक्रम MSSIDC, FIEO, भारत सरकारचे MSME मंत्रालय आणि जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या RAMP योजनेच्या एकत्रित प्रयत्नांचे द्योतक आहे. या माध्यमातून MSME क्षेत्राच्या शाश्वत आर्थिक विकासाला आणि जागतिक एकात्मतेला चालना मिळत आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन विकास पानसरे, आयएएस, व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC; श्री खुशवंत जैन, प्रादेशिक अध्यक्ष, FIEO (WR); श्री खालिद खान, संयोजक, RBSM समिती, FIEO (WR); श्री नितीन अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, सीमाशुल्क आयुक्तालय, नागपूर; डॉ. सुधीर जाखेरे, संचालक, टपाल सेवा, इंडिया पोस्ट; तसेच श्री हरित गुप्ता, उपमहाव्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या उपस्थितीत झाले.
MSME उद्योगांना सर्वसमावेशक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रमात DGFT, बँका, विमा कंपन्या, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि इंडिया पोस्ट यांच्या विशेष मार्गदर्शन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय, बांबू उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, ज्यामुळे प्रदेशाची औद्योगिक क्षमता आणि स्थानिक उत्पादनांची समृद्ध परंपरा अधोरेखित झाली. दोन दिवसीय कार्यक्रमादरम्यान आयोजित सांस्कृतिक संध्याकाळीत महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन परदेशी खरेदीदारांना घडविण्यात आले.
६ वी RBSM यशस्वीरित्या पूर्ण होणे हे RAMP उपक्रमांतर्गत आणखी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरले आहे. यामुळे महाराष्ट्राची आघाडीचे उत्पादन आणि अभियांत्रिकी केंद्र म्हणून असलेली ओळख अधिक बळकट झाली आहे. या व्यासपीठामुळे केवळ व्यावसायिक संधी निर्माण झाल्या नाहीत, तर तंत्रज्ञान हस्तांतरण, क्षमता विकास आणि निर्याताभिमुख वाढ यांनाही प्रोत्साहन मिळाले आहे.
या यशस्वी उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुढील रिव्हर्स बायर-सेलर मीट कोल्हापूर येथे FIEO च्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार असून, भविष्यात पुणे येथेही अशाच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

0 Comments