मुंबई, 4th August 2026 : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जुलै 2026 रोजी मंत्रालयात 'एआय साथी फॉर एज्युकेटर्स' या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या हस्ते या एआय साथी अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मुख्य सचिव श्री. रणजित सिंह देवल, शिक्षण आयुक्त श्री. सचिंद्र प्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक डॉ. हेमंत वासेकर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, माध्यमिक शिक्षण संचालक श्री. महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक श्री. शरद गोसावी, एससीईआरटीच्या उपसंचालक सौ. वर्षाराणी भोपळे, उपविभाग प्रमुख श्री. राजेंद्र वाकडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे उपविभागप्रमुख डॉ. संदीप मुळे तसेच कोटक एज्युकेशन फाउंडेशनतर्फे सौ. अलका पागारे, श्री. मिलिंद पांडे आणि श्री. दीपक पाठक हे उपस्थित होते.
या उपक्रमाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्य प्रकल्प पथकात सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उपसंचालक सौ. ज्योती शिंदे आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधीक्षक श्री. निवास कांबळे यांचाही समावेश होता. शिक्षकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावरील मूलभूत साक्षरता विकसित करण्यासाठी आणि शिक्षणामध्ये एआयचा अर्थपूर्ण वापर करता यावा यासाठी तयार करण्यात आलेला ‘एआय साथी फॉर एज्युकेटर्स’ हा या प्रकारातील पहिलाच संरचित व्यावसायिक विकास कार्यक्रम आहे.
‘एआय साथी’ हा महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या ऑनलाइन प्रशिक्षण धोरणांतर्गत अनिवार्य प्रशिक्षण कार्यक्रम म्हणून निवडला गेलेला पहिला आभासी (व्हर्च्युअल) अभ्यासक्रम आहे. राज्याच्या 20 तासांच्या अनिवार्य ऑनलाइन व्यावसायिक विकास कार्यक्रमाचा भाग म्हणून या अभ्यासक्रमासाठी चार तासांच्या प्रमाणित प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील इयत्ता 1 ली ते 12 वीपर्यंतच्या शिक्षकांसह सुमारे 7.5 लाख शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम अनिवार्य असेल. एससीईआरटीच्या माहितीनुसार, मूल्यमापनासाठी सादर करण्यात आलेल्या 10 अभ्यासक्रमांमधून ‘एआय साथी’ची निवड करण्यात आली. राज्यात एआय-सक्षम शिक्षक क्षमता विकासासाठी कोटक एज्युकेशन फाउंडेशनने दिलेल्या योगदानाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्याची दखल घेण्यात आली आहे.
नेतृत्वाचा दृष्टीकोन
सन्माननीय शिक्षण आयुक्त श्री. सचिंद्र प्रताप सिंह (भा. प्र. से.) म्हणाले, ‘एआय साथी हा ऑनलाइन अभ्यासक्रम राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसाठी विकसित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामुळे एआय हे शिक्षकांच्या दैनंदिन शैक्षणिक कामकाजातील सहकारी ठरेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. या ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून राज्याने शिक्षणामध्ये एआयचा समावेश करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.’
एससीईआरटीचे सन्माननीय संचालक डॉ. हेमंत वासेकर (आयएएस) म्हणाले, ‘एआयने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रवेश केला असून, शिक्षकांसाठी तो एक विश्वासार्ह सहकारी ठरू शकतो. या अभ्यासक्रमामुळे शिक्षक अधिक परिणामकारक आणि कार्यक्षम पद्धतीने काम करू शकतील, असा माझा ठाम विश्वास आहे.’
कोटक एज्युकेशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गणेश राजा म्हणाले, ‘शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी शिक्षक आहेत आणि एआयने त्यांची जागा घेण्याऐवजी त्यांच्या क्षमता अधिक सक्षम करणारे साधन म्हणून विकसित व्हायला हवे. 'एआय साथी फॉर एज्युकेटर्स'च्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील शिक्षकांना एआय समजून घेण्यासाठी, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी आणि वर्गामध्ये त्याचा जबाबदारीने वापर करण्यासाठी सक्षम करत आहोत. हा उपक्रम मराठीत उपलब्ध असल्यामुळे आणि वर्गातील प्रत्यक्ष वापरावर भर देत असल्यामुळे तो अधिक परिणामकारक ठरतो. या माध्यमातून आम्ही सर्वसमावेशक, व्यवहार्य आणि वर्गातील वास्तवाशी जोडलेली भविष्याभिमुख शिक्षक व्यवस्था उभारण्याच्या दिशेने काम करत आहोत.’
कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) जयश्री रमेश म्हणाल्या, ‘अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तळागाळात परिणाम घडवून आणणारे उपक्रम एकमेकांच्या विरोधात नसतात, हे 'एआय साथी' सिद्ध करते. महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी प्रथमच मराठी भाषेतील असे साधन उपलब्ध झाले आहे, जे त्यांना एआय साक्षर होण्यास मदत करते. कोणतेही उपकरण एकट्याने हे करू शकत नाही. शिक्षक आत्मविश्वासाने आणि नैतिक मूल्यांचे भान ठेवून नेतृत्व करतात तेव्हा त्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा लाभ होतो. हाच बदल घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’
कोटक एज्युकेशन फाउंडेशनने 2023 पासून शिक्षक क्षमता विकास उपक्रमांमध्ये एआयचा समावेश करण्यास सुरुवात केली. उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वर्गामध्ये आत्मविश्वासाने, जबाबदारीने आणि परिणामकारकपणे वापर करता यावा, यासाठी शिक्षकांना सक्षम करणे हा त्यामागील उद्देश होता. 2024–25 या कालावधीत, केईएफने धड्यांचे नियोजन, कंटेन्ट तयार करणे, वर्गातील सहभाग वाढवणे, मूल्यमापन आणि एआयचा नैतिक वापर अशा विषयांवरील एआयच्या व्यावहारिक उपयोगांवर वेबिनार आयोजित केले.
त्यानंतर केईएफच्या राष्ट्रीय इनोव्हेशन परिषद ‘इन्स्पायर 2025’च्या माध्यमातून या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले. या परिषदेत अध्यापन आणि अध्ययन अधिक प्रभावी करण्यामध्ये एआयची भूमिका अधोरेखित करण्यात आली, तसेच एआय हे शिक्षकांची जागा घेणारे नव्हे, तर त्यांना सक्षम करणारे साधन असल्यावर भर देण्यात आला. या उपक्रमांच्या यशाच्या आधारावर एससीईआरटी महाराष्ट्र आणि कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांनी शिक्षकांच्या गरजांनुसार सहजपणे व्यापक स्तरावर राबवता येईल असा एआय अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी भागीदारी केली.
संरचित, टप्प्याटप्प्यांवर आधारित अभ्यासक्रमाची पद्धत
‘एआय साथी’ हा तीन स्तरांमध्ये विकसित करण्यात आलेला प्रगत अभ्यासक्रम आहे. शिक्षकांच्या डिजिटल तयारीच्या विविध स्तरांचा विचार करून तो सर्वसमावेशक पद्धतीने तयार करण्यात आला आहे.
● बेसिक स्तर : एआयची मूलभूत संकल्पना आणि धड्यांचे नियोजन, मूल्यमापन, व्हिडिओ तयार करणे तसेच प्रभावी प्रॉम्प्ट्स तयार करणे यांसारख्या सोप्या उपयोगांची ओळख करून देण्यात येते.
● इंटरमिजिएट स्तर : वर्गामध्ये अध्यापन पद्धती आणि एआय यांचा प्रभावी समन्वय साधण्यावर या स्तरात भर देण्यात आला आहे. यामुळे शिक्षकांना चौकस अध्ययन (एन्क्वायरी बेस्ड लर्निंग), प्रकल्पाधारित अध्ययन (प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग), वैयक्तिक गरजांनुसार अध्यापन आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी एआयचा वापर करता येतो.
● अॅडव्हान्स्ड स्तर : एआय-सक्षम शिक्षण क्षेत्रात शिक्षकांना नेतृत्व आणि नवकल्पनांसाठी तयार करण्यावर या स्तरात भर देण्यात आला आहे. शाळांमध्ये एआय-आधारित उपाययोजना तयार करणे आणि त्यांची व्यापक अंमलबजावणी करणे यासाठी शिक्षकांना सक्षम करण्यात येते.
या टप्प्याटप्प्याने रचलेल्या अभ्यासक्रम संरचनेमुळे शिक्षकांना शैक्षणिक तसेच इतर कामांसाठी एआयचा वापर करताना हळूहळू आत्मविश्वास आणि कौशल्य विकसित करण्यास मदत होते.
महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना हा अभ्यासक्रम सहज उपलब्ध व्हावा, यासाठी ‘एआय साथी’ संपूर्णपणे मराठी भाषेत विकसित करण्यात आला आहे. ‘दीक्षा’ (DIKSHA) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या स्व-गतीने पूर्ण करता येणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये व्हिडिओ, अध्ययन साहित्य आणि मूल्यमापनाचा समावेश असून राज्यातील सुमारे 6 लाख शिक्षकांपर्यंत पोहोचण्याची त्याची क्षमता आहे. जुलै 2025 मध्ये एससीईआरटीची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर अभ्यासक्रमाची निर्मिती, परीक्षण आणि अंमलबजावणी करण्यात आली. एससीईआरटीच्या डॅशबोर्डद्वारे नोंदणी, सहभाग आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्याची आकडेवारी यांच्या आधारे या उपक्रमाची प्रगती आणि परिणामांचा नियमित आढावा घेण्यात येईल.
राष्ट्रीय आणि जागतिक चौकटींशी सुसंगत
हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 आणि युनेस्को टीचर कॉम्पिटन्सी फ्रेमवर्कशी सुसंगत आहे. एआयच्या युगात शिक्षकांसाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये आणि नैतिक बाबींवर या अभ्यासक्रमात विशेष भर देण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पुढील तीन प्रमुख घटकांवर आधारित आहे :
● एआयची मूलभूत तत्त्वे आणि त्यांचे उपयोग
● अध्यापनासाठी एआयचा वापर
● एआयमधील नैतिकता, ज्यामध्ये गोपनीयता, पूर्वग्रह आणि जबाबदारीने वापर यांचा समावेश आहे
कोटक एज्युकेशन फाउंडेशन
कोटक एज्युकेशन फाउंडेशन ही कोटक महिंद्रा समूहाच्या शिक्षण-केंद्रित कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांची प्रमुख अंमलबजावणी करणारी संस्था आहे. ‘कोटक कर्मा’ ही समूहाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांची एकत्रित ओळख आहे.
आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांना आणि युवकांना शिक्षण व मूलभूत कौशल्ये उपलब्ध करून देऊन त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करण्याच्या ध्येयाने सुरू झालेल्या या प्रवासाला 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. कमी उत्पन्न गटासाठी दर्जेदार शिक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या, संस्थेने विकसित केलेल्या ‘इंच वाइड माइल डीप’ दृष्टिकोनामुळे देशभरातील विविध प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केईएफचा दृष्टिकोन प्रामुख्याने पुढील तीन बाबींवर आधारित आहे :
a) शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सर्वांगीण उपक्रम
b) उच्च शिक्षणासाठी समान संधी उपलब्ध करून देणाऱ्या शिष्यवृत्ती
c) उपजीविकेसाठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गोवा आणि गुजरातमध्ये शाळांमधील नेतृत्व अधिक सक्षम करणे, शिक्षकांची क्षमता विकसित करणे, डिजिटल-फर्स्ट अध्ययन वातावरण तयार करणे, माध्यमिकपूर्व स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये संवादात्मक इंग्रजीबाबत आत्मविश्वास निर्माण करणे तसेच शिक्षकांना मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान प्रभावीपणे शिकवण्यासाठी सक्षम करणे, हे कोटक एज्युकेशन फाउंडेशन (केईएफ) राबवत असलेल्या प्रमुख उपक्रमांपैकी आहेत.
संधी अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोटक एज्युकेशन फाउंडेशनने (केईएफ) विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील महत्त्वाच्या टप्प्यांवर त्यांना आधार देणारी सक्षम शिष्यवृत्ती व्यवस्था उभारली आहे. 2021 मध्ये सुरू करण्यात आलेली ‘कोटक कन्या स्कॉलरशिप’ भारतातील आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थिनींना व्यावसायिक उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत, शैक्षणिक मार्गदर्शन आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देते.
'कोटक ज्युनिअर स्कॉलरशिप'मुळे मुंबई महानगर प्रदेशातील होतकरू विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी आणि 12वीमध्ये प्रवेश घेताना आर्थिक मदत, मार्गदर्शन आणि शैक्षणिक सहाय्य उपलब्ध होते आणि त्यांच्या शिक्षणातील सातत्य कायम ठेवण्यास मदत होते. उच्च शिक्षणाच्या स्तरावर 'कोटक ग्रॅज्युएट स्कॉलरशिप'मुळे पात्र विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत, संसाधने आणि मार्गदर्शन उपलब्ध होतात, ज्यामुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण आणि करिअरचा प्रवास अधिक यशस्वीपणे करता येतो.
केईएफच्या व्यावसायिक शिक्षण कार्यक्रमात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बेरोजगार युवकांना माहिती तंत्रज्ञान कौशल्ये, संवादात्मक इंग्रजी, जीवन कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येतो. रोजगारक्षमतेवर विशेष लक्ष केंद्रित करणाऱ्या या कार्यक्रमाअंतर्गत पात्र सहभागींची व्यावसायिक क्षेत्रात आत्मविश्वासाने प्रवेश करून यशस्वी होण्यासाठी तयारी करून घेण्यात येते.
आज केईएफ आपल्या प्रवासातील एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभा आहे. अनेक वर्षांच्या प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाच्या बळावर संस्था आता आपल्या उपक्रमांची व्याप्ती आणि परिणामकारकता अधिक वाढवत आहे. ‘एक शाळा’ या केंद्रबिंदूवर आधारित दृष्टिकोनातून पुढे जात, जिल्हा आणि राज्य स्तरावर शिक्षणामध्ये व्यापक परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने संस्था काम करत आहे. या बदलाच्या माध्यमातून केईएफ शिक्षण व्यवस्थेत दीर्घकालीन, शाश्वत आणि व्यापक परिणाम घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या : www.kotakeducationfoundation.org

0 Comments