Business

Header Ads

9 जिल्हा परिषद शाळा व 1 सिंधी रेल्वे स्टेशन येथे आरओ बसवून अदाणी फाउंडेशनचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम !

नागपूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने अदाणी फाउंडेशन आणि अदाणी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (AVIPL) यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणा परिसरातील 9 जिल्हा परिषद शाळा आणि 1 सिंधी रेल्वे स्टेशन येथे आरओ यंत्रांची स्थापना करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत टाकळघाट, भारकस, बिडगणेशपूर, मांडवा, गोंडवाना, पोही, परसोडी, हळदगाव आणि खापरी येथील 9 जिल्हा परिषद शाळांमध्ये तसेच सिंधी रेल्वे स्टेशन परिसरात आरओ यंत्रे बसविण्यात आली आहेत. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, प्रवाशांना व स्थानिक नागरिकांना वर्षभर शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

या आरओ यंत्रांचा लाभ केवळ शाळेतील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शाळांलगत असलेल्या अंगणवाडी केंद्रे, ग्रामपंचायत कार्यालये, परिसरातील नागरिक तसेच सिंधी रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांनाही होणार आहे. त्यामुळे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यास हातभार लागणार आहे.

ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी अदाणी फाउंडेशन सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून हा आरओ स्थापना प्रकल्प राबविण्यात आला आहे. विद्यार्थी, नागरिक आणि प्रवाशांच्या आरोग्याला प्राधान्य देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत पदाधिकारी, रेल्वे प्रशासन व ग्रामस्थांनी सक्रिय सहकार्य केले. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व संबंधितांनी अदाणी फाउंडेशन व अदाणी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

सदर उपक्रमाचे आयोजन व समन्वय अदाणी फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी राजेश मेश्राम यांनी केले. तसेच ममता पेंदाम आणि अर्पणा पाटील यांनी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments