नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) नगर रचना विभागात अंतर्गत वाद उफाळून आला असून, प्रभारी उपसंचालक ऋतुराज अभिमन्यू जाधव यांच्या मनमानी कारभाराविरोधात विभागातील १८ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट मोर्चा उघडला आहे. कर्मचाऱ्यांनी जाधव यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या तत्काळ बदलीची मागणी केली आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही सविस्तर लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.
बुधवारी मनपा कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनातही उपसंचालक जाधव यांच्या बदलीचा मुद्दा चांगलाच गाजला.
तक्रारीत १२ गंभीर मुद्दे; महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तनाचाही आरोप !
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रार अर्जात जाधव यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे १२ महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.
या मध्ये प्रामुख्याने :
🔷अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतत मानसिक त्रास देणे व रात्रीच्या वेळी फोन करून कामाची विचारणा करणे.
🔷महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य व अपमानास्पद वर्तन करणे.
🔷फाइल्स आणि प्रकरणे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून इतर लोकांसमोर कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देणे.
🔷विभागात बाहेरील दलालांचा हस्तक्षेप वाढला असून, दलालांसमोरच कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे.
या तक्रारकर्त्यांमध्ये तब्बल १८ तांत्रिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात २ नगर रचनाकार, ४ उपअभियंता, १ शाखा अभियंता, ५ सहायक नगर रचनाकार आणि ६ कनिष्ठ अभियंत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अधिकाऱ्यांनी एकत्र येत तक्रार केल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

0 Comments