Business

Header Ads

गुरुदेवांच्या जयघोषाने अकोला दुमदुमले; गुरु गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित्त नाथ समाजाची भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न !

थोडक्यात पण महत्त्वाचे

आमदार वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते पूजन; गुरु गोरक्षनाथ आणि भारतमातेच्या वेशभूषेने वेधले सर्वांचे लक्ष; भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा भव्य जागर

अकोला : नाथ संप्रदायाचे आराध्य दैवत, योगसाधनेचे अधिष्ठान आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या परमपूज्य श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त वैकुंठ चतुर्दशीच्या पवित्र पर्वावर अकोला शहरात नाथ समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. 'ॐ नमो आदेश, नाथांचा जयघोष' अशा भक्तिमय वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. समाजातील महिला, पुरुष, युवक, युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत गुरुभक्तीचा जागर केला.

ही शोभायात्रा केवळ धार्मिक उत्सव नव्हती, तर नाथ संप्रदायाची गौरवशाली परंपरा, गुरुनिष्ठा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारा श्रद्धेचा सोहळा ठरली. शोभायात्रेचा शुभारंभ श्री बाराभाई गणपती मंदिर येथून करण्यात आला. यावेळी आमदार वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर जय हिंद चौक, सिटी कोतवाली, गांधी रोड आणि वसंत टॉकीज रोड मार्गे ही शोभायात्रा गणेश घाट येथे पोहोचली. शोभायात्रेत श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांची मूर्ती विराजमान असलेला आकर्षक रथ, गुरुदेवांच्या वेशभूषेतील सहभागी, वारकरी संप्रदायाचा समूह आणि पारंपरिक दिंडी यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.

गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. विशेष म्हणजे गुरु गोरक्षनाथ महाराजांची वेशभूषा साकारलेल्या बालकाने आणि भारतमातेच्या वेशभूषेने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या वेशभूषांमधून भारतीय संस्कृती, राष्ट्रप्रेम, गुरुभक्ती आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. शोभायात्रा मार्गावर शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ऊर्जा पर्व फाउंडेशन, भारतीय जनता पक्ष अकोला महानगर तसेच वाल्मिकी समाज पंचायतीच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. विविध समाजघटकांनी दाखविलेल्या आपुलकीच्या प्रतिसादातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश अधोरेखित झाला.

नाथ समाजातील महिला भगिनींची उपस्थिती, तरुणांचा उत्साह आणि ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील गुरुभक्तीचा आनंद या सोहळ्याला विशेष उंची देणारा ठरला. आपल्या गुरूंच्या प्रकट दिनानिमित्त समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत श्रद्धेची पताका उंचावली. गणेश घाट येथे श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांची आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. गुरुपरंपरेप्रती निष्ठा, धार्मिक संस्कृतीचे जतन आणि समाजाला एकत्र आणण्याची प्रेरणा देणारी ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. काळ बदलत असला, पिढ्या बदलत असल्या तरी गुरूंच्या चरणी असलेली श्रद्धा आणि नाथ संप्रदायाची परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जात आहे, याची प्रचिती या शोभायात्रेने दिली. गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या विचारांचा, साधनेचा आणि मानवतेच्या संदेशाचा जागर करीत अकोल्यातील नाथ समाजाने भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला.

Post a Comment

0 Comments