महाराष्ट्र : दैवी बंधुत्वाची कथा जिवंत करणारी सोनी सबची ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ ही मालिका आपल्या भावपूर्ण कथनशैली, भव्य पौराणिक सादरीकरण आणि प्रभावी अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या मालिकेत भगवान कार्तिकेयाची भूमिका साकारणारे अभिनेते सुबहान खान यांनी कार्तिकेयाच्या पात्राला न्याय देण्यासाठी गरजेची असलेली शारीरिक ताकद आणि योद्ध्याचे मनोबल दाखवण्यासाठी भारतातील सर्वात प्राचीन मार्शल आर्ट्सपैकी एक असलेल्या कलारीपयट्टूचे तीन महिन्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले. सुबहानसाठी ही भूमिका साकारणे म्हणजे फक्त एका दैवी व्यक्तिमत्त्वाचे रूप धारण करणे नव्हते, तर शरीर आणि मन या दोन्ही स्तरांवर संपूर्ण परिवर्तनाची प्रक्रिया होती.
भगवान कार्तिकेयांच्या पराक्रम आणि सौंदर्याचे वास्तव दर्शन घडवण्यासाठी सुबहान यांनी प्रसिद्ध मार्शल आर्ट्स गुरू दीपक दास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. दीपक दास यांनी यापूर्वी टायगर श्रॉफ आणि कृति सेनन यांसारख्या बॉलीवूड कलाकारांनाही प्रशिक्षण दिले आहे. सुबहानचा प्रवास कॅमेऱ्यांपासून दूर अशा मास्टर दीपक दास यांच्या प्रशिक्षण केंद्रातील चटईवर सुरू झाला. यातील प्रत्येक हालचाल - ज्यात झपाट्याने मारलेली किक असो वा नाजूक, पण प्रभावी आसन - या सर्वांतून संतुलन, नियंत्रण आणि एकाग्रतेचे धडे त्यांना मिळाले. दक्षिण भारतीय परंपरेशी खोलवर जोडलेल्या या प्राचीन कलारीपयट्टू मार्शल आर्टद्वारे सुबहान यांनी केवळ आपली चपळता आणि शक्ती वाढवली नाही, तर दैवी योद्ध्याचे प्रतीक असलेली शिस्त आणि मानसिक शांतताही आत्मसात केली.
आपल्या तयारीबद्दल बोलताना सुबहान म्हणाले, “सुरुवातीला सर्वात मोठी लढाई शारीरिक प्रशिक्षणाची नव्हती, तर शिस्तीची होती. दररोज सकाळी वर्गात वेळेवर पोहोचण्यासाठी मी नायगावहून अंधेरीपर्यंत प्रवास करत असे. दीपक सर अतिशय कडक आहेत. एक मिनिट जरी उशीर केला तर त्यांच्या मौनाचा सामना करावा लागे, ते शब्दांपेक्षा जास्त कठोर असते. मात्र, त्यामुळे मला कळले की, योद्ध्याला शारीरिक ताकदीपूर्वी वेळेचे भान असणे गरजेचे आहे.”
सुबहान म्हणतात, सुरुवातीचे काही आठवडे हे प्रशिक्षण आव्हानात्मक होते. यात नव्या हालचाली होत्या. शरीराला ताणणे, उड्या मारणे आणि कलारीच्या शस्त्रांच्या जलद हालचाली कराव्या लागत. त्यामुळे शरीर दुखत होते. पण, हळूहळू हा थकवा सहनशक्तीत बदलला व हे थकलेपण एकाग्रतेत परिवर्तित झाले. "हळूहळू मी फक्त योद्ध्याची भूमिका करत नव्हतो, तर खरोखरच एका योद्ध्यासारखी हालचाल करायला लागलो. माझं शरीर मजबूत झालं, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे माझं मन अधिक दृढ, घट्ट झालं,” असं ते सांगतात.
अभिनेता आपल्यातल्या या बदलाचे श्रेय आपल्या प्रशिक्षकांना आणि सर्जनशील टीमला देतो. “ही शिस्त मी दीपक सरांमुळे आत्मसात केली - त्यांनी मला माझ्या मर्यादांपलीकडे नेलं आणि निर्मात्यांनी माझ्यावर या दैवी भूमिकेसाठी विश्वास दाखवला. कलारीपयट्टू आता माझ्या अस्तित्वाचा भाग झाला आहे; ते फक्त शोसाठी शिकलेले कौशल्य नाही, तर एक विचारसरणी आहे, जी माझ्या मनात कायम राहते.”
या कठोर तयारीमुळे सुबहान यांनी कार्तिकेयाच्या भूमिकेला प्रामाणिक, अॅंक्शनने भरलेला आणि आत्म्याला स्पर्श करणारा असा नवा पैलू दिला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांसाठी हा अनुभव दृश्य आणि भावनिक दोन्ही स्तरांवर समृद्ध ठरतो.
हा महान प्रवास पाहण्यासाठी नक्की पाहा ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’, सोमवार ते शनिवार, रात्री ८ वाजता, फक्त ‘सोनी सब’वर.

0 Comments